ताज्या घडामोडीदेश विदेश

दिल्लीत बंदुकीऐवजी ढोल-ताशांचा नाद; गडचिरोलीच्या रेला नृत्याने दिल्ली गाजवली!

दिल्लीतील नॉर्थ-ईस्ट फेस्टिव्हलमध्ये

गडचिरोली, प्रतिनिधी :-

कधीकाळी माओवादाच्या सावटाखाली असलेल्या गडचिरोलीत आता बंदुकीऐवजी पारंपरिक वाद्यांचा नाद घुमू लागला आहे. गडचिरोली पोलीस दलाच्या ‘प्रोजेक्ट उडान’अंतर्गत जिल्ह्यातील युवक-युवती आणि आत्मसमर्पित माओवादी सदस्यांनी दिल्ली येथे झालेल्या ९व्या नॉर्थ-ईस्ट स्टुडन्ट फेस्टिव्हलमध्ये रेला नृत्य सादर करून गडचिरोलीच्या आदिवासी संस्कृतीची ओळख देशपातळीवर करून दिली.

४ आणि ५ सप्टेंबर रोजी दिल्ली येथे झालेल्या या महोत्सवात चार आत्मसमर्पित माओवादी सदस्यांसह ‘अनुप डान्स ग्रुप’च्या १४ युवक-युवती अशा एकूण १८ स्पर्धकांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. पारंपरिक वाद्यांच्या साथीने सादर करण्यात आलेल्या रेला नृत्याला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या सादरीकरणातून शांतता, एकता, बंधुभाव आणि सामाजिक सलोख्याचा संदेश देण्यात आला. विशेष म्हणजे, हिंसक माओवादी विचारसरणीचा त्याग करून आत्मसमर्पण केलेल्या सदस्यांना प्रथमच राष्ट्रीय स्तरावरील सांस्कृतिक व्यासपीठावर सहभागी होण्याची संधी मिळाली.

‘प्रोजेक्ट उडान’च्या माध्यमातून आत्मसमर्पित माओवादी सदस्यांना शिक्षण, कौशल्य विकास, रोजगार, क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रमांशी जोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दिल्लीतील सहभागामुळे त्यांच्या आत्मविश्वासाला बळ मिळून कलागुणांना नवे व्यासपीठ मिळाल्याचे पोलीस दलाने सांगितले.

या सहभागाबद्दल पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक गोकुल राज जी. आणि अपर पोलीस अधीक्षक अहेरी हर्षवर्धन बी. जे. यांनी स्पर्धकांचे कौतुक केले. महोत्सवाच्या आयोजनासाठी नागरी कृती शाखेचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत शेळके आणि पोलीस अंमलदारांनी परिश्रम घेतले.

माओवादाच्या हिंसक वाटेवरून मुख्य प्रवाहाकडे झालेला हा प्रवास आणि त्याला मिळालेली सांस्कृतिक अभिव्यक्ती गडचिरोलीच्या बदलत्या चित्राची नवी कहाणी ठरली आहे.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker