गडचिरोली, प्रतिनिधी :-
जिल्ह्याचा सर्वांगीण, शाश्वत आणि नियोजनबद्ध विकास साधण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘विकसित गडचिरोली व्हिजन २०४७’ या विकास आराखड्याची माहिती भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार आणि या उपक्रमाचे मुख्य प्रवर्तक डॉ. देवराव होळी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
सर्किट हाऊस येथे झालेल्या पत्रकार परिषदेत डॉ. होळी यांनी सांगितले की, जिल्ह्याच्या भविष्यातील विकासाची दिशा ठरविताना विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक, महिला, युवक आणि विविध संस्थांच्या प्रतिनिधींच्या सूचनांचा विचार करण्यात आला आहे.
यासाठी १६ व १७ ऑगस्ट रोजी आयोजित दोन दिवसीय कार्यशाळेत शिक्षण, आरोग्य, रोजगार, शेती-सिंचन, उद्योग, पर्यटन, पायाभूत सुविधा, महिला सक्षमीकरण, युवक-क्रीडा, वनाधारित अर्थव्यवस्था, ग्रामविकास, PESA, वनहक्क आणि आदिवासी विकास आदी विषयांवर विचारमंथन करण्यात आले.
२६ ऑगस्ट रोजी जिल्हा वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात या व्हिजनचे सादरीकरण करण्यात आले. जिल्ह्याच्या विकासासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा यावेळी ‘जिल्हा गौरव पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला.
गडचिरोलीकडे वनसंपदा, बांबू, कृषी उत्पादन, वनौषधी, पर्यटन आणि मानवी संसाधनांची मोठी क्षमता आहे. या नैसर्गिक व मानवी संपत्तीचे योग्य नियोजन, स्थानिक पातळीवर प्रक्रिया व मूल्यवर्धन आणि रोजगारनिर्मिती केल्यास जिल्ह्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणता येईल, असे डॉ. होळी यांनी सांगितले.
‘विकसित गडचिरोली व्हिजन २०४७’ हा केवळ विकासाचा दस्तऐवज नसून सामूहिक सहभागातून उभा राहणारा जिल्ह्याच्या भविष्यासाठीचा विकाससंकल्प आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेला डॉ. नरेंद्र उंदीरवाडे, अमोल कुळमेथे, विलास देशमुखे, पुष्पलता कुमरे, विद्या दुग्गा, आरती कोल्हे, उमेश उईके, सूरज मडावी, काशिनाथ देवघडे, योगेश कुमरे आदी उपस्थित होते.
Back to top button