गडचिरोली, प्रतिनिधी :-
विक्रीच्या उद्देशाने घरामागील सांदवाडीत गांजाची लागवड करणाऱ्या ५८ वर्षीय व्यक्तीस गडचिरोली पोलिसांनी ताब्यात घेतले. ४३.६५३ किलो गांजा, अंदाजे २१ लाख ८२ हजार ६५० रुपये किमतीचा मुद्देमाल या कारवाईत जप्त करण्यात आला.
पोलीस स्टेशन कोटगुल हद्दीतील नांगपूर येथे ६ सप्टेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली. गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा आणि कोटगुल पोलिसांच्या पथकाने अधारी धनसिंग कुवरढेरीया (५८, रा. नांगपूर, ता. कोरची) याच्या घरामागील सांदवाडीची पंचांसमक्ष झडती घेतली. यावेळी गांजाची लागवड केलेली झाडे आढळून आली.
या प्रकरणी कोटगुल पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला एक दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विवेक वायकर करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण फेगडे आणि कोटगुलचे प्रभारी अधिकारी पोउपनि. विवेक वायकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली.
Back to top button