ताज्या घडामोडीदेश विदेश

माजी नक्षलवादी नेता भूपती यांची नियुक्ती कायम ठेवा- शेकाप

राजकीय दबावाखाली निर्णय घेऊ नका...

गडचिरोली, प्रतिनिधी :-

गोंडवाना विद्यापीठाच्या ‘एकल उपक्रम’चे समन्वयक म्हणून आत्मसमर्पित नक्षलवादी मल्लोजुलू वेणूगोपाल राव उर्फ भूपती यांची झालेली नियुक्ती रद्द करण्याची मागणी काही संघटनांकडून होत आहे. ही मागणी द्वेषभावनेतून होत असून, कोणत्याही राजकीय अथवा सामाजिक दबावाला बळी न पडता भूपती यांची नियुक्ती कायम ठेवावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या आदिवासी, भटके विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भाई रामदास जराते यांनी केली आहे.

जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूंना दिलेल्या पत्रात जराते यांनी म्हटले आहे की, नक्षल चळवळीमुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी व कुटुंबांचे नुकसान झाले. मात्र, आत्मसमर्पण करून लोकशाही मार्ग स्वीकारलेल्या नक्षल कार्यकर्त्यांचे पुनर्वसन करणे ही शासनाच्या आत्मसमर्पण धोरणाची भूमिका आहे. त्याचाच भाग म्हणून भूपती यांना विद्यापीठाच्या उपक्रमात काम करण्याची संधी देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

जल, जंगल, जमीन, ग्रामसभा, पेसा आणि वनाधिकार या विषयांवरील भूपती यांच्या दीर्घ अनुभवाचा विद्यापीठाच्या उपक्रमासाठी उपयोग होऊ शकतो, असा दावा जराते यांनी केला आहे. त्यांच्या नियुक्तीला विरोध करणाऱ्यांवरही त्यांनी गंभीर आरोप केले असून, या आरोपांची जबाबदारी संबंधित व्यक्तींची असल्याचे स्पष्ट आहे.

नव्या पिढीला नैसर्गिक संसाधने आणि आदिवासींच्या हक्कांचा अभ्यास करण्यासाठी भूपती यांच्या अनुभवाचा उपयोग होईल. त्यामुळे कोणत्याही दबावाखाली त्यांची नियुक्ती रद्द करू नये, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker