आपला जिल्हाताज्या घडामोडीराजकीय
अनधिकृत बांधकामप्रकरणी नगरसेविका शिल्पा हेमके यांचे सदस्यत्व रद्द करा-बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीची मागणी
कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

गडचिरोली, प्रतिनिधी :-
नगर परिषद गडचिरोलीच्या नगरसेविका तथा महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापती शिल्पा अंकित हेमके (शिल्पा उद्धवराव गव्हारे) यांच्या कथित अनधिकृत बांधकामप्रकरणी तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांचे सदस्यत्व रद्द व अपात्रतेची कारवाई करावी, अशी मागणी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या गडचिरोली जिल्हा शाखेने आज पत्रकार परिषदेत केली.
पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा विदर्भ कमेटी सदस्य मिलिंद बांबोळे यांनी सांगितले की, जिल्हा सहआयुक्त (न.प. प्रशासन), जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली यांनी २४ ऑगस्ट २०२६ रोजी मुख्याधिकारी, नगर परिषद गडचिरोली यांना पत्र देऊन मौजा गडचिरोली येथील सर्वे क्रमांक ११/१-क, भूखंड क्रमांक ६६ वरील अनधिकृत बांधकामाची चौकशी करण्याबाबत निर्देश दिले आहेत.
पक्षाच्या आरोपानुसार, सदर भूखंड नगर परिषदेकडे गहाण राखीव असतानाही तेथे बांधकाम करण्यात आले असून, बांधकामासाठी आवश्यक परवानगी अथवा मंजूर नकाशा उपलब्ध नसल्याचा दावा करण्यात आला. या प्रकरणात नगरसेविका शिल्पा हेमके व त्यांचे पती अंकित हेमके यांच्या सहभागाबाबत चौकशी करून कारवाई करण्याची मागणी पक्षाने केली.
आठ दिवसांचा कालावधी उलटूनही कारवाई झालेली नसल्याचा आरोप करत पक्षाने तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करून सदस्यत्व रद्द व अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी केली. कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.
‘आरोप बिनबुडाचे; न्यायालयाचा निर्णय मान्य’- नगरसेविका शिल्पा हेमके
दरम्यान, या पत्रकार परिषदेनंतर नगरसेविका शिल्पा अंकित हेमके यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावले. “सदर भूखंडावर तात्पुरते बांधकाम असून, तेथे ले-आउटचे काम सुरू आहे. बांधकामाचे साहित्य ठेवण्यासाठी हे बांधकाम करण्यात आले आहे. याबाबत नगर परिषदेकडून मला नोटीस देण्यात आली असून, त्याला गडचिरोली सेशन कोर्टात आव्हान दिले आहे. न्यायालय जो निर्णय देईल, तो मला मान्य राहील. विरोधकांचे आरोप बिनबुडाचे आहेत,” असे शिल्पा हेमके यांनी स्पष्ट केले.



