आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शासकीय आश्रम शाळेतील निकृष्ट अन्नामुळे आदिवासी विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात; नंदुभाऊ नरोटे यांची अन्न व औषध प्रशासनाकडे मागणी

शासकीय आश्रमशाळांतील अन्नधान्याची तपासणी करा; दोषींवर कठोर कारवाई करा

गडचिरोली, प्रतिनिधी :-

महाराष्ट्रातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या अन्नधान्याची तत्काळ तपासणी करून निकृष्ट अन्नधान्य पुरविणाऱ्या दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी सरसेनापती नंदुभाऊ नरोटे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे निवेदन सादर केले आहे.

राज्यातील आश्रमशाळांमध्ये पुरविण्यात येणारे अन्नधान्य अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून ते विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. तसेच काही आश्रमशाळांमध्ये शुद्ध पाण्याचीही व्यवस्था नसल्याने विद्यार्थ्यांना विविध आजारांना सामोरे जावे लागत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

निवेदनानुसार, राज्यातील ५८४ शासकीय आश्रमशाळांना अन्नधान्याचा पुरवठा केंद्रीय भंडार, मुंबईमार्फत पेटी कंत्राटदारांच्या माध्यमातून केला जातो. तर जवळपास ५९० अनुदानित आश्रमशाळांमध्ये संस्थाचालकांकडून अन्नधान्याचा पुरवठा केला जात असल्याचे सांगण्यात आले आहे. या सर्व आश्रमशाळांमधील अन्नधान्याची अन्न व औषध प्रशासन विभागाने प्रत्यक्ष तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

आदिवासी विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित हा गंभीर विषय असून, अन्नधान्याचे नमुने तपासून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नंदुभाऊ नरोटे यांनी केली.

यासंदर्भातील निवेदन अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ आणि विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांना देण्यात आले आहे. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.

यावेळी विलास नरोटे, जिल्हाध्यक्ष, मोहन पुराम, ज्योती पेंदाम, महिला जिल्हा अध्यक्ष, बाळासाहेब ठाकरे वडसा, विलास कन्नाके यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker