गडचिरोली, प्रतिनिधी :-
महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीचे प्रशासक आणि ज्येष्ठ होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉ. बाहुबली शहा यांनी १६ जुलै २०२५ रोजी मुंबईतील आझाद मैदानात सुरू होणाऱ्या ‘होमिओपॅथी स्वाभिमान आंदोलन’ अंतर्गत आमरण उपोषण पुकारले असून, या उपोषणाला गडचिरोली जिल्ह्यातील होमिओपॅथी डॉक्टरांनी ठाम पाठिंबा जाहीर केला आहे. १४ जुलै रोजी इंदिरा गांधी चौकातील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत याबाबत माहिती देण्यात आली.
उपोषणामागील पार्श्वभूमी
उपोषणाचे मूळ कारण CCMP (Certificate Course in Modern Pharmacology) उत्तीर्ण होमिओपॅथिक डॉक्टरांची महाराष्ट्र वैद्यक परिषदेत (MMC) नोंदणी रोखण्याचा Indian Medical Association (IMA) चा विरोध आहे.
डॉ. शहांच्या मते, IMA ने खोट्या व अर्धसत्य माहितीच्या आधारे माध्यमांद्वारे आणि आंदोलनांद्वारे शासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे CCMP पात्र डॉक्टरांच्या स्वाभिमानाला धक्का पोहोचला आहे. तसेच MMC गेल्या ८ वर्षांपासून कायद्याचे उल्लंघन करत आहे, असा आरोपही त्यांनी केला.
CCMP अभ्यासक्रमाबाबत स्पष्टता
हा अभ्यासक्रम २०१६ साली विधिमंडळात कायदेशीररित्या मंजूर झाला असून, याला शासनाची संपूर्ण मान्यता आहे. २०१७ पासून हजारो डॉक्टरांनी हा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे, ज्यामध्ये एक वर्षाचा आधुनिक चिकित्सा औषधशास्त्र अभ्यास व प्रात्यक्षिक अनुभव समाविष्ट आहे. त्यामुळे हे डॉक्टर आधुनिक वैद्यक सेवा देण्यास सक्षम असल्याचा दावा करण्यात आला.
IMA चे प्रयत्न निष्फळ
CCMP अभ्यासक्रमास विरोध करताना IMA ने उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात केलेले प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. त्यामुळे हा अभ्यासक्रम कायदेशीर व वैध असल्याचे पुनरुच्चार करण्यात आला.
मुख्यमंत्र्यांना निवेदन
या आंदोलनाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदनाद्वारे देण्यात आली आहे.
डॉक्टरांचा सक्रीय पाठिंबा
या पत्रकार परिषदेला गडचिरोली जिल्ह्यातील अनेक होमिओपॅथी डॉक्टर उपस्थित होते. त्यामध्ये डॉ. तामदेव दुधबळे, डॉ. वरुण राव दूधबळे, डॉ. सत्यविजय दूधबळे, डॉ. गणेश सातपुते, डॉ. संदिप भांडेकर, डॉ. सुशील शेंडे, डॉ. अंचित विश्वास, डॉ. कमलाकर रोडे, डॉ. आर. डी. मुनघाटे, डॉ. के. व्ही. कोहळे, डॉ. प्रणित बॅनर्जी, डॉ. संदीप ठाकरे, डॉ. प्रमोद धोडरे, डॉ. मिथुन रायसिडाम, डॉ. रवींद्र पाछळ, डॉ. रवी बुर्लावार आदींचा समावेश होता.
Back to top button