ताज्या घडामोडीदेश विदेश
“जंगलात भटकू नका, मुख्य प्रवाहात या” — आत्मसमर्पित संगीता उर्फ ललिता यांचे नक्षलवाद्यांना भावनिक आवाहन

गडचिरोली, प्रतिनिधी :-
जंगलातील कठीण जीवन, सततची भीती आणि हिंसेच्या मार्गातून कोणताही सकारात्मक बदल घडत नाही, हे स्वतःच्या तब्बल २२ वर्षांच्या अनुभवातून उमगल्याने “हिंसेचा मार्ग सोडा आणि संविधानाचा स्वीकार करून मुख्य प्रवाहात या,” असे भावनिक आवाहन आत्मसमर्पित नक्षलवादी संगीता उर्फ ललिता यांनी आपल्या माजी सहकाऱ्यांना केले आहे. त्यांच्या या आवाहनामुळे नक्षल चळवळीतील वास्तव पुन्हा एकदा समोर आले असून समाजात चर्चेला उधाण आले आहे.
संगीता उर्फ ललिता यांनी आपल्या पती गिरिधर तुमरेती व इतर सहकाऱ्यांसह दिनांक २२ जून २०२४ रोजी गडचिरोली पोलीस दलासमोर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केले होते. सन २००२ पासून त्या नक्षल चळवळीत सक्रिय होत्या. या दीर्घ काळात त्यांनी जंगलातील अत्यंत कठीण, अस्थिर आणि जीवघेण्या परिस्थितीत जीवन व्यतीत केले. सततची भीती, अन्न-पाण्याची टंचाई, आरोग्याच्या सुविधा नसणे आणि कुटुंबापासून दूर राहणे या सगळ्या गोष्टींचा त्यांनी जवळून अनुभव घेतला.
आपल्या अनुभवांबद्दल बोलताना संगीता म्हणाल्या, “नक्षल चळवळीत राहून कोणतेही ठोस उद्दिष्ट साध्य होत नाही. उलट आयुष्य अंधारमय होते. हिंसेतून केवळ विनाशच निर्माण होतो. अनेक तरुण चुकीच्या मार्गाला लागतात आणि त्यांच्या कुटुंबीयांचे आयुष्य उद्ध्वस्त होते. त्यामुळे हा मार्ग सोडून मी संविधानिक मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला.”
त्या पुढे म्हणाल्या, “जंगलात भटकंती करून काहीही मिळत नाही. आपल्या आई-वडिलांचे, कुटुंबीयांचे दुःख समजून घ्या. ते आजही आपल्या परतीची वाट पाहत आहेत. त्यांचा आनंद आणि स्वतःचे उज्ज्वल भविष्य लक्षात घेऊन आत्मसमर्पण करा आणि सन्मानाने सामान्य जीवन जगा.”



