मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालेला कोठी-कोरनार पूल तीन वर्षांतच खचला
दोषींवर कारवाईची आजाद समाज पार्टीची मागणीqa

गडचिरोली, प्रतिनिधी :-
एटापल्ली तालुक्यात महाराष्ट्र-छत्तीसगडला जोडणारा कोठी-कोरनार पूल उद्घाटनानंतर अवघ्या तीन वर्षांतच खचल्याने बांधकामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत आजाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी निकृष्ट दर्जाच्या कामामागील जबाबदार अधिकारी आणि ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
राज बन्सोड यांनी सांगितले की, १५ ऑगस्ट २०२३ रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री (आताचे मुख्यमंत्री) देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन करण्यात आले होते. गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात जाऊन मुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या पुलाची अवस्था तीन वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच खचल्याने सार्वजनिक निधीच्या वापराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
“ही घटना केवळ निकृष्ट दर्जाच्या बांधकामाची नाही, तर सार्वजनिक पैशांच्या उघड लुटीचा पुरावा आहे,” असा आरोप राज बन्सोड यांनी केला. स्थानिक सक्षम ठेकेदारांना डावलून बाहेरील ठेकेदारांना कोट्यवधी रुपयांची कामे देण्यात येतात आणि त्यातून दर्जाहीन कामे केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
या प्रकरणी आजाद समाज पार्टीने पुढील मागण्या केल्या आहेत:
संबंधित कामासाठी जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी आणि अभियंत्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे.
संबंधित ठेकेदाराचा परवाना रद्द करण्यात यावा.
ठेकेदार आणि दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा.
संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्यात यावी.
राज बन्सोड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून म्हटले की, “ज्या पुलाचे उद्घाटन आपण स्वतः केले, त्या पुलाच्या निकृष्ट दर्जाच्या कामाचीही आपणच गंभीर दखल घ्यावी. दोषींवर कठोर कारवाई झाली नाही, तर जनतेत चुकीचा संदेश जाईल.”
दोषींवर तातडीने कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही आजाद समाज पार्टीने दिला आहे.



