गडचिरोली, प्रतिनिधी :-
गडचिरोलीच्या विकासकामांवरून काँग्रेसकडून करण्यात येणाऱ्या टीकेला भाजपने आक्रमक प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्यावर पत्रकार परिषदेत माजी खासदार डॉ. अशोक नेते यांनी थेट निशाणा साधत, गडचिरोलीच्या विकासकामांवर खुल्या व्यासपीठावर चर्चा करण्याचे आव्हान दिले.
मुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा राजकीय प्रयत्न होत असल्याचा आरोप डॉ. नेते यांनी केला. सोशल मीडिया, व्हिडिओ आणि ‘रील्स’च्या माध्यमातून सध्याच्या गडचिरोलीतील समस्या दाखवून सरकारवर टीका केली जात असल्याचे सांगत, “आज रील्स बनवत आहात; मग पूर्वीच्या गडचिरोलीची परिस्थिती दाखविणाऱ्या रील्स उपलब्ध असत्या तर आज झालेला बदल किती मोठा आहे, हे दिसले असते,” असा टोला त्यांनी लगावला.
‘आरोप नको, आकडेवारीवर चर्चा करा’
डॉ. नेते यांनी महेंद्र ब्राह्मणवाडे आणि काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना विकासाच्या मुद्द्यांवर तथ्य व आकडेवारीच्या आधारे खुल्या व्यासपीठावर चर्चा करण्याचे आव्हान दिले.
रेल्वे आणि महामार्गांसाठी झालेली गुंतवणूक, गडचिरोलीचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोनसरी येथील औद्योगिक प्रकल्प, सुरजागड परिसरातील खनिजाधारित उद्योग, स्थानिक रोजगार, सिंचन प्रकल्प आणि हवाई कनेक्टिव्हिटी या विषयांवर चर्चा करण्याचे आवाहन त्यांनी केले.
‘गडचिरोलीच्या विकासाला काँग्रेसची अडचण?’
गडचिरोलीत मागील काही वर्षांत स्टील हब, मायनिंग हब, रस्ते, रेल्वे, आरोग्य, सिंचन, उद्योग आणि रोजगाराच्या क्षेत्रात मोठी कामे सुरू असल्याचा दावा डॉ. नेते यांनी केला. त्यांच्या मते, वडसा-गडचिरोली रेल्वे मार्ग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोनसरी येथील स्टील प्रकल्प, राष्ट्रीय महामार्गांचे काम, सिंचन प्रकल्प आणि विमानतळाची प्रक्रिया ही विकासाची उदाहरणे आहेत.
“आज गडचिरोली जिल्हा औद्योगिक आणि आर्थिकदृष्ट्या नव्या टप्प्यावर उभा आहे. जनतेला आरोप-प्रत्यारोपांपेक्षा प्रत्यक्ष विकास हवा आहे,” असे डॉ. नेते यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला प्रामुख्याने भाजपा जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे, आदिवासी मोर्चा प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवरावजी होळी, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, नगराध्यक्षा अँड. प्रणोती सागर निंबोडकर, किसान मोर्चा प्रदेश सचिव रमेश भुरसे, महिला मोर्चा प्रदेश सचिव रेखाताई डोळस, भाजपच्या नेत्या चंदाताई कोडवते, शहराध्यक्ष तथा न.प. सभापती सिम्माताई कन्नमवार, जिल्हा उपाध्यक्ष अरुणजी हरडे, ज्येष्ठ नेते डॉ. भारत खटी, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुधाकरजी पेटकर, संजय बारापात्रे, सलीम शेख तसेच मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Back to top button