आपला जिल्हाताज्या घडामोडीराजकीय
गणरायाच्या साक्षीने भाजपमधील ‘दुरावा’ मिटला ?
माजी खासदार डॉ. अशोक नेते आणि आमदार डॉ. मिलिंद नरोटे एकाच व्यासपीठावर

उदय धकाते,गडचिरोली :-
गडचिरोली भाजपमधील अंतर्गत राजकारणामुळे मागील काही महिन्यांपासून दोन गट असल्याची चर्चा सुरू असतानाच गणेश चतुर्थीच्या निमित्ताने या चर्चेला वेगळे वळण मिळाले आहे. आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे यांच्या भाजपा कर्तव्य कक्ष कार्यालयात श्रीगणेशाच्या स्थापना सोहळ्यासाठी माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते आणि आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे हे दोन्ही नेते एकत्र आले. त्यामुळे भाजपच्या राजकीय वर्तुळात या भेटीची विशेष चर्चा रंगली आहे.
गणेश चतुर्थीच्या मंगलमय पर्वानिमित्त कर्तव्य कक्षात श्रीगणेशाची विधिवत व भक्तिभावाने स्थापना करण्यात आली. यावेळी माजी खासदार डॉ. अशोकजी नेते आणि आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे यांनी एकत्रितपणे श्रीगणरायाची पूजा-अर्चा व आरती केली. दोन्ही नेते एकत्र दिसल्याने उपस्थित भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
राजकीय मतभेदांपेक्षा संघटन महत्त्वाचे ?
मागील काही काळात गडचिरोली भाजपमध्ये दोन गटांच्या राजकारणाची चर्चा राजकीय वर्तुळात होती. विविध कार्यक्रम आणि राजकीय घडामोडींमुळे या चर्चेला वेळोवेळी हवा मिळत होती. मात्र गणेशोत्सवाच्या निमित्ताने डॉ. अशोक नेते आणि डॉ. मिलिंद नरोटे यांनी एकत्र येत श्रीगणरायाची पूजा केल्याने भाजपच्या संघटनात्मक एकजुटीबाबत सकारात्मक संकेत मिळाल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली आहे.
विशेष म्हणजे, हा सोहळा कोणत्याही राजकीय शक्तिप्रदर्शनापेक्षा श्रद्धा, स्नेह आणि एकत्रितपणाचा प्रसंग ठरला. दोन्ही नेत्यांमधील संवाद, आपुलकी आणि परस्पर सन्मानाचे दर्शन यावेळी घडल्याचे उपस्थितांनी अनुभवले.
गणरायाच्या चरणी गडचिरोलीच्या विकासाची प्रार्थना
गणेशोत्सव हा सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि सकारात्मक ऊर्जेचा संदेश देणारा उत्सव आहे. त्याच भावनेतून यावेळी गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी, सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आणि जनसेवेच्या कार्याला अधिक बळ मिळावे, अशी प्रार्थना करण्यात आली.
“वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटी समप्रभ।
निर्विघ्नं कुरु मे देव, शुभकार्येषु सर्वदा॥”
या मंगलमंत्राच्या जयघोषात श्रीगणेशाची आरती करण्यात आली. गणरायाच्या चरणी जिल्ह्यात सुख, शांती, समृद्धी आणि बंधुभाव नांदावा, अशी मंगलकामना करण्यात आली.
कार्यकर्त्यांमध्ये नव्या समीकरणाची चर्चा
डॉ. अशोक नेते आणि डॉ. मिलिंद नरोटे यांना एकत्र पाहिल्याने उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. दोन्ही नेत्यांचे एकत्र येणे हा केवळ गणेशोत्सवाचा योगायोग की भविष्यातील संघटनात्मक समन्वयाची सुरुवात? याबाबत आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
गडचिरोली भाजपसमोर आगामी काळात संघटन मजबूत ठेवण्याचे मोठे आव्हान असताना, दोन्ही प्रमुख नेत्यांनी एकत्र येऊन दिलेला हा स्नेह, समन्वय आणि एकजुटीचा संदेश कार्यकर्त्यांसाठी निश्चितच महत्त्वाचा ठरला आहे.
आता भाजप कार्यकर्ते म्हणतं आहेत…
गणपती बाप्पा मोरया !
मंगलमूर्ती मोरया !




