आपला जिल्हाताज्या घडामोडी

गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील रस्त्यांच्या विकासासाठी 57. 18 कोटी रुपये मंजूर

खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या पाठपुराव्याला यश

गडचिरोली, प्रतिनिधी :-

गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम व अद्यापही विकासापासून वंचित असलेल्या भागातील रस्त्यांच्या विकासासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-४ अंतर्गत तब्बल ५७.१८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून जिल्ह्यातील सुमारे ४७.२४ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची निर्मिती करण्यात येणार आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील अनेक दुर्गम व आदिवासीबहुल गावांना आजही पक्क्या रस्त्यांची प्रतीक्षा आहे. दळणवळणाच्या अपुऱ्या सुविधांमुळे नागरिकांना शिक्षण, आरोग्य, बाजारपेठ तसेच शासकीय सेवांपर्यंत पोहोचताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे या रस्त्यांची निर्मिती जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

या रस्त्यांच्या माध्यमातून भामरागड, धानोरा, एटापल्ली यासह जिल्ह्यातील इतर दुर्गम भागातील गावांना तालुका व जिल्हा मुख्यालयाशी जोडण्यास मोठी मदत होणार आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना दळणवळणाची सुविधा उपलब्ध होण्यासोबतच शेतमालाची वाहतूक, विद्यार्थ्यांचा प्रवास, आरोग्यसेवा आणि शासकीय योजनांचा लाभ घेणे अधिक सुलभ होणार आहे.

याबाबत खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी सांगितले की, “गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम आणि विकासापासून वंचित भागांना दर्जेदार रस्त्यांनी जोडणे ही माझी प्राथमिकता आहे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-४ अंतर्गत ५७.१८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याने जिल्ह्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या निधीच्या मंजुरीसाठी केंद्र सरकारचे मनःपूर्वक आभार.आगामी काळातही गडचिरोली जिल्ह्यातील रस्ते व पायाभूत सुविधांच्या विकासासाठी विविध माध्यमातून अधिकाधिक निधी उपलब्ध करून देण्यासाठी माझे प्रयत्न सातत्याने सुरू राहतील.”

गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून अधिकाधिक निधी आणण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी यावेळी स्पष्ट केले.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker