आपला जिल्हाक्राईमताज्या घडामोडी

अंमली पदार्थांच्या नशेत वाद; तरुणाचा दगड-टी रॉडने घातक हल्ला करून खून

वाघोली शिवारातील हत्येचा ४८ तासांत छडा; दोन विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात

गडचिरोली, प्रतिनिधी :-

अंमली पदार्थ आणि मद्याच्या नशेत झालेल्या वादातून ३३ वर्षीय तरुणाचा दगड व मोटारसायकलमधील टी-रॉडने डोक्यात घाव घालून खून केल्याची धक्कादायक घटना चामोर्शी तालुक्यातील वाघोली शिवारात उघडकीस आली आहे. या प्रकरणाचा ४८ तासांत छडा लावत गडचिरोली पोलिसांनी दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले आहे.

वाघोली शिवारात चामोर्शी-मूल मार्गालगत ८ सप्टेंबर रोजी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी चामोर्शी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मृतदेहाजवळ ओळख पटविणारी कोणतीही वस्तू नसल्याने पोलिसांसमोर मृताची ओळख पटविण्याचे मोठे आव्हान होते.

पोलिसांनी तांत्रिक माहिती, गोपनीय माहिती तसेच शेजारील जिल्ह्यांतील पोलिसांशी समन्वय साधून तपास केला. त्यातून मृत व्यक्तीची ओळख नंदकिशोर मोतीलाल मिश्रा ऊर्फ बंटी (वय ३३, रा. मूल, जि. चंद्रपूर) अशी पटली.

तपासादरम्यान दोन अल्पवयीन मुलांचा गुन्ह्यात सहभाग असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. चौकशीत धक्कादायक बाब समोर आली. नंदकिशोर याच्याकडून अंमली पदार्थ मिळत असल्याची माहिती असल्याने दोन्ही बालक त्याच्यासोबत अंमली पदार्थ व मद्य सेवन करण्यासाठी वाघोली शिवारात गेले होते. तिघांनीही नशा केल्यानंतर त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. वादाचे रूपांतर भांडणात झाल्यानंतर दोन्ही बालकांनी दगड आणि मोटारसायकलमधील टी-रॉडने नंदकिशोरच्या डोक्यात वार केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.

गंभीर जखमी झालेल्या नंदकिशोरचा मृत्यू झाला आणि दोन्ही बालक घटनास्थळावरून पळून गेल्याचे तपासात समोर आले आहे. दोन्ही विधीसंघर्षग्रस्त बालकांना बाल न्याय मंडळ, गडचिरोलीसमोर हजर करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशानुसार अपर पोलीस अधीक्षक कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या नेतृत्वात चामोर्शी पोलिसांनी ही कारवाई केली. पुढील तपास सपोनि. सुमेध बन्सोडे करीत आहेत.

अंमली पदार्थांच्या नशेने एका तरुणाचा जीव घेतल्याने या घटनेने गडचिरोलीतील अमली पदार्थांच्या वाढत्या धोक्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker