आपला जिल्हाताज्या घडामोडीशासन निर्णय
दररोज महसूल अधिकाऱ्यांना आता ‘जनता दरबार’ बंधनकारक!
दररोज दुपारी ३ ते ५ नागरिकांसाठी वेळ राखीव; बैठका-व्हिडिओ कॉन्फरन्सिंगलाही मनाई

गडचिरोली, प्रतिनिधी :-
नागरिकांच्या तक्रारी घेण्यासाठी महसूल अधिकाऱ्यांनी कार्यालयात उपलब्ध राहावे, यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांनी प्रत्येक कार्यालयीन दिवशी दुपारी ३ ते ५ ही दोन तासांची वेळ सर्वसामान्य नागरिकांच्या भेटीसाठी व तक्रार निवारणासाठी अनिवार्यपणे राखीव ठेवावी, असे स्पष्ट निर्देश शासनाने दिले आहेत.
महसूल विभागाने ९ सप्टेंबर २०२६ रोजी जारी केलेल्या परिपत्रकात स्थानिक प्रशासनाकडून नागरिकांच्या तक्रारी व अडचणींचे निराकरण होणे अपेक्षित असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र अधिकारी अथवा कर्मचारी कार्यालयात उपलब्ध नसल्याने नागरिकांना आपल्या तक्रारी घेऊन मंत्रालयापर्यंत धाव घ्यावी लागत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना थेट अधिकाऱ्यांशी संवाद साधता यावा, यासाठी राखीव वेळ निश्चित करण्यात आली आहे.
‘३ ते ५’मध्ये बैठक नको !
विशेष म्हणजे नागरिकांसाठी राखीव केलेल्या या वेळेत कोणतीही अंतर्गत बैठक किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आयोजित करू नये, असे शासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे ‘अधिकारी बैठकीत आहेत’, ‘व्हीसी सुरू आहे’ किंवा अन्य कारणांमुळे नागरिकांना भेट नाकारण्याची शक्यता कमी होणार आहे.
कार्यालयाच्या दारावरच दिसणार नागरिक भेटीची वेळ
दुपारी ३ ते ५ ही नागरिकांसाठी राखीव वेळ असल्याची माहिती कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर ठळकपणे प्रदर्शित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना अधिकाऱ्यांच्या भेटीची निश्चित वेळ स्पष्टपणे समजणार आहे.


