आपला जिल्हाआरोग्यताज्या घडामोडी

गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी ५० लाखांहून अधिक रुपयांची आर्थिक मदत

खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या पुढाकाराला यश

गडचिरोली, प्रतिनिधी :-

गडचिरोली–चिमूर लोकसभा क्षेत्रातील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या आणि अडचणी सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या पुढाकारातून गंभीर आजारांनी ग्रस्त आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. खासदार डॉ. किरसान यांच्या प्रयत्नांमुळे प्रधानमंत्री राष्ट्रीय सहायता निधी (PMNRF) अंतर्गत आतापर्यंत ५० लाखांहून अधिक रुपयांची आर्थिक मदत गरजू रुग्णांच्या उपचारासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

खासदार म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर १ जून २०२४ पासून आजपर्यंत जवळपास २३ गरजू रुग्णांना त्यांच्या गंभीर आजारांवरील उपचारासाठी प्रधानमंत्री राष्ट्रीय सहायता निधीतून आर्थिक सहाय्य मिळवून देण्यात आले आहे. कर्करोग, किडनी ट्रान्सप्लांट तसेच इतर गंभीर आजारांवरील उपचारासाठी मोठ्या प्रमाणात खर्च येत असल्याने अनेक गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांसमोर आर्थिक संकट निर्माण होते. अशा परिस्थितीत शासनाच्या सहायता निधीतून मिळणारी आर्थिक मदत रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आधार ठरत आहे.

गडचिरोली–चिमूर लोकसभा क्षेत्र हे भौगोलिकदृष्ट्या मोठे आणि दुर्गम भागांनी व्यापलेले आहे. जिल्ह्यातील अनेक नागरिकांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असून, गंभीर आजाराचे निदान झाल्यानंतर महागड्या उपचारांचा खर्च करणे त्यांच्या आवाक्याबाहेरचे असते. त्यामुळे पैशाअभावी कोणत्याही रुग्णाचा उपचार थांबू नये, यासाठी खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या माध्यमातून गरजू रुग्णांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.

रुग्णांच्या कुटुंबीयांकडून उपचारासाठी आर्थिक मदतीची मागणी प्राप्त झाल्यानंतर संबंधित प्रकरणाची आवश्यक कागदपत्रे, वैद्यकीय अहवाल आणि उपचाराचा अंदाजित खर्च याबाबतची प्रक्रिया पूर्ण करून ती प्रकरणे प्रधानमंत्री राष्ट्रीय सहायता निधीसाठी पाठविण्यात येतात. या प्रक्रियेमध्ये आवश्यक ते मार्गदर्शन आणि पाठपुरावा करण्यात आल्याने अनेक गरजू रुग्णांना उपचारासाठी आर्थिक मदत मिळाली आहे.

गंभीर आजारांवरील उपचाराचा खर्च मोठा असल्याने रुग्णांच्या कुटुंबीयांवर आर्थिक संकट ओढवते. अशा परिस्थितीत प्रधानमंत्री राष्ट्रीय सहायता निधीतून मिळालेली मदत ही संबंधित कुटुंबांसाठी मोठा आधार ठरत आहे. खासदार

डॉ. किरसान यांच्या पुढाकारामुळे आतापर्यंत जवळपास २३ रुग्णांना उपचारासाठी मदत मिळाल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले आहे.

खासदार डॉ. नामदेव किरसान हे केवळ लोकसभा क्षेत्रातील विकासकामांपुरते मर्यादित न राहता सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नांनाही प्राधान्य देत आहेत. विकासकामांसोबतच आरोग्य क्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठीही त्यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू आहे.

गडचिरोली–चिमूर लोकसभा क्षेत्रातील कोणताही गरजू रुग्ण केवळ आर्थिक परिस्थितीमुळे उपचारापासून वंचित राहू नये, हा आपला प्रयत्न असल्याचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी सांगितले.

आरोग्य हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत प्रश्न असून, गरजू रुग्णांना योग्य वेळी उपचार मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रधानमंत्री राष्ट्रीय सहायता निधी तसेच केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांना मिळवून देण्यासाठी आपला पाठपुरावा सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker