आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सिरोंचा – माहिती हवी तर तब्बल ४ लाख २४ हजार रुपये भरा!
सिरोंचा विशेष प्रकल्प विभागातील १,०६० निविदांची माहिती

गडचिरोली, प्रतिनिधी :-
शासकीय कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी माहितीच्या अधिकाराचा वापर करणाऱ्या आरटीआय कार्यकर्त्याला माहिती मिळविण्यासाठी तब्बल ₹४ लाख २४ हजार रुपये भरण्याची मागणी करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
आरटीआय कार्यकर्ते मनोज सुरेश उराडे यांनी सिरोंचा येथील विशेष प्रकल्प विभागाकडे सन २०२१ ते जुलै २०२६ या कालावधीतील निविदांबाबत माहिती मागितली होती. त्यावर विभागाने दिलेल्या उत्तरानुसार या कालावधीत एकूण १,०६० निविदा मंजूर झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
विभागाच्या पत्रातील हिशेबानुसार प्रत्येक निविदेच्या माहितीच्या १०० प्रती गृहीत धरल्यास १,०६,००० प्रती होतात. या प्रतींसाठी ₹४ प्रति प्रत या दराने तब्बल ₹४,२४,००० रक्कम भरण्याची मागणी करण्यात आली आहे.
माहितीच्या अधिकाराचा वापर करणे सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहणार का?
आरटीआय कार्यकर्त्याने शासकीय निविदांची माहिती मागितली असताना एवढी मोठी रक्कम भरण्याची मागणी झाल्याने माहितीच्या अधिकाराचा प्रभावी वापर सर्वसामान्य नागरिकांना करता येईल का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
एकीकडे शासन पारदर्शक प्रशासनाचा पुरस्कार करते, तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात कागदपत्रांच्या प्रतींसाठी लाखो रुपयांचा खर्च येत असल्यास नागरिकांसमोर मोठे आर्थिक आव्हान उभे राहू शकते. त्यामुळे संबंधित विभागाने माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्याची शक्यता आहे का, याबाबतही स्पष्टता देणे गरजेचे आहे.




