आपला जिल्हाक्राईमताज्या घडामोडी

आरमोरीत सुगंधित तंबाखूचा तब्बल ४५.२० लाखांचा साठा जप्त!

गडचिरोली, प्रतिनिधी :-

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अवैध व्यवसायांविरोधात गडचिरोली पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली असून, आरमोरी-कुरखेडा मार्गावर प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची वाहतूक करणारा सहा चाकी ट्रक पकडून तब्बल ४५ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून, आणखी एका आरोपीचा शोध सुरू आहे.

१६ सप्टेंबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेला कुरखेडा ते आरमोरी मार्गावरून प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा साठा वाहून नेला जाणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आयशर सहा चाकी ट्रक क्रमांक सीजी ०८ झेड ८७९२ अडवून झडती घेतली.

झडतीदरम्यान ट्रकमध्ये बागबान च्युइंग टोबॅको, डीजे प्रीमियम क्वालिटी सुगंधित तंबाखू, झेड ब्लॅक प्रीमियम क्वालिटी सुगंधित तंबाखू आणि क्रेज सुगंधित तंबाखू असा मोठा साठा आढळून आला. पोलिसांच्या माहितीनुसार, तंबाखूच्या साठ्याची किंमत ३० लाख २० हजार रुपये, तर ट्रकाची अंदाजे किंमत १५ लाख रुपये, असा एकूण ४५ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

कारवाईनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाला माहिती देण्यात आली. अन्न सुरक्षा अधिकारी सुरेश तोरेम यांच्या फिर्यादीवरून आरमोरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४१३/२०२६ नोंद करण्यात आला आहे.

या प्रकरणात शाहु धर्मेशकुमार इंदेरमन (वय २८, रा. जोशीलमती, गेंदाटोला, जि. राजनांदगाव, छत्तीसगड) याला अटक करण्यात आली आहे. चौकशीत त्याने सदर माल टेमन बेदराम साहू (रा. जोशीलमती, जि. राजनांदगाव, छत्तीसगड) याचा असल्याचे सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. टेमन साहू याचा शोध सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., सहायक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण फगडे व आरमोरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन झनक यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने ही कारवाई केली.

प्रतिबंधित तंबाखूच्या मोठ्या साठ्यावर झालेल्या या कारवाईमुळे अवैध तंबाखू विक्री-वितरण करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker