गडचिरोली, प्रतिनिधी :-
शिवनी गावाजवळ झालेल्या बस अपघातात जखमी झालेल्या ३८ प्रवाशांना गडचिरोलीच्या सामान्य रुग्णालयात दाखल करून तातडीने उपचार करण्यात आले. यामध्ये ७ प्रवासी जखमी झाले असून ३१ प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
अपघाताची माहिती मिळताच सामान्य रुग्णालय प्रशासनाने आपत्कालीन वैद्यकीय यंत्रणा तातडीने कार्यान्वित केली. रुग्णवाहिकांच्या माध्यमातून प्रवाशांना विलंब न करता रुग्णालयात आणण्यात आले. दाखल झालेल्या प्रत्येक रुग्णाची वैद्यकीय तपासणी करून दुखापतीच्या स्वरूपानुसार उपचार व वैद्यकीय निरीक्षण करण्यात आले.
जिल्हा शल्यचिकित्सकांच्या निर्देशानंतर आपत्कालीन यंत्रणा सज्ज
नवनियुक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवि गावंडे यांनी अपघाताची माहिती मिळताच रुग्णालयातील आपत्कालीन सेवा सज्ज ठेवण्याचे निर्देश दिले. अतिदक्षता विभागासह आवश्यक उपचार विभागातील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, कक्षसेवक व इतर कर्मचाऱ्यांना तातडीने उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या.
रुग्णांची संख्या लक्षात घेऊन उपलब्ध मनुष्यबळाचा योग्य वापर करत तपासणी, उपचार आणि निरीक्षणाची व्यवस्था करण्यात आली.
वैद्यकीय महाविद्यालयाशी समन्वय
सामान्य रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या समन्वयाने जखमी प्रवाशांवर उपचार करण्यात आले. विविध वैद्यकीय विभागांतील तज्ज्ञ डॉक्टरांनी आवश्यकतेनुसार रुग्णांची तपासणी केली.
आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्याकडून रुग्णांची पाहणी
दरम्यान, गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी सामान्य रुग्णालयात दाखल प्रवाशांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांनी उपचार व्यवस्थेचीही पाहणी केली.
सध्या सर्व ३८ प्रवाशांना आवश्यक वैद्यकीय सेवा देण्यात आली असून वैद्यकीय पथकाकडून त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाने दिली.
Back to top button