Gen Z च्या भवितव्याशी खेळू नका; गरज पडल्यास गडचिरोलीला ‘जंतर मंतर’ बनवू – आजाद समाज पार्टीचा इशारा
गडचिरोली, प्रतिनिधी :-
गोंडवाना विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या धोरणांमुळे हजारो विद्यार्थ्यांवर मानसिक, शैक्षणिक आणि आर्थिक अन्याय होत असल्याचा आरोप करत आजाद समाज पार्टीने विद्यापीठ प्रशासनाला तीव्र इशारा दिला आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणारे निर्णय तात्काळ मागे घ्यावेत, अन्यथा गोंडवाना विद्यापीठाच्या परीक्षा भवनासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन छेडून गडचिरोलीला विद्यार्थी संघर्षाचे केंद्र बनवू, असा इशारा पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड आणि युवक जिल्हाध्यक्ष विकी खोब्रागडे यांनी दिला.
आजाद समाज पार्टीच्या निवेदनानुसार, पदवीच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी आतापर्यंत CBCS पॅटर्न अंतर्गत पाच सत्रांचे शिक्षण पूर्ण केले आहे. मात्र, काही विषयांमध्ये बॅकलॉग असलेल्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) लागू झाल्याचे कारण देत एकाच वेळी CBCS पॅटर्नच्या बॅकलॉग परीक्षा आणि NEP पॅटर्नच्या परीक्षा देण्याची सक्ती केली जात आहे. ही अट अन्यायकारक आणि अव्यवहार्य असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे.
या प्रश्नासंदर्भात विद्यार्थ्यांसह आजाद समाज पार्टीच्या शिष्टमंडळाने कुलगुरूंची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र कुलगुरू अनुपस्थित असल्याने विद्यार्थ्यांच्या वतीने कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन यांना निवेदन देऊन निषेध नोंदविण्यात आला.
पक्षाने स्पष्ट भूमिका मांडत, ज्या विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षापासून CBCS पद्धतीने शिक्षण घेतले आहे, त्यांना त्याच पद्धतीने परीक्षा पूर्ण करण्याची संधी मिळाली पाहिजे, अशी मागणी केली. दोन वेगवेगळ्या पद्धतींच्या परीक्षा देण्याची सक्ती केल्याने विद्यार्थ्यांवर मानसिक, आर्थिक आणि शैक्षणिक ताण वाढत असल्याचा आरोप करण्यात आला.
याशिवाय, परीक्षा शुल्क आणि री-चेकिंग शुल्क अवाजवी असल्याचा आरोप करत प्रति पेपर री-चेकिंग शुल्क कमी करावे तसेच उत्तरपत्रिकांच्या पुनर्तपासणीची प्रक्रिया वेळबद्ध करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली.
यावेळी राज बन्सोड म्हणाले, “Gen Z च्या शिक्षणाशी खेळ करणाऱ्यांना आजाद समाज पार्टी कधीही माफ करणार नाही. विद्यार्थ्यांच्या भविष्यावर घाला घालणाऱ्या प्रत्येक निर्णयाविरोधात आम्ही रस्त्यावर उतरू. गरज पडल्यास गडचिरोलीला देशाच्या ‘जंतर मंतर’प्रमाणे विद्यार्थी संघर्षाचे केंद्र बनवू; मात्र विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ देणार नाही.”
विद्यापीठ प्रशासनाने तातडीने न्याय्य तोडगा काढावा, अन्यथा हजारो विद्यार्थ्यांसह तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी विद्यापीठ प्रशासनाची राहील, असा इशाराही आजाद समाज पार्टीने दिला आहे.
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन
Back to top button