कुरखेडा, प्रतिनिधी :-
गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा येथील होतकरू युवक शिशिर मधुकर बोबाटे यांची भारत सरकारच्या केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (Central Pollution Control Board – CPCB) मध्ये वैज्ञानिक (Scientist) पदावर नियुक्ती झाली असून, त्यांनी नुकताच आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. त्यांच्या या यशामुळे कुरखेडा तालुक्यासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
शिशिर बोबाटे हे लहानपणापासूनच अभ्यासू व बुद्धिमान विद्यार्थी म्हणून ओळखले जात होते. त्यांचे नर्सरीपर्यंतचे शिक्षण कुरखेडा येथील लिटिल फ्लॉवर कॉन्व्हेंट (सध्याचे छत्रपती इंग्लिश प्रायमरी स्कूल) येथे झाले. त्यानंतर इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण ग्रामीण विकास प्राथमिक शाळा, कुरखेडा, तर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण नेवजाबाई हितकारिणी विद्यालय, ब्रह्मपुरी येथे पूर्ण केले. पुढे त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.
पदव्युत्तर शिक्षणादरम्यानच त्यांनी देशातील अत्यंत प्रतिष्ठेच्या CSIR-NET-JRF परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले. त्यानंतर SET, DBT-BET-JRF आणि GATE या स्पर्धा परीक्षाही पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होऊन त्यांनी आपल्या गुणवत्तेची छाप पाडली. सध्या ते भारतीय विषविज्ञान संशोधन संस्थेत (Indian Institute of Toxicology Research) आचार्य (Ph.D.) पदवीचे संशोधनही करीत आहेत.
विशेष म्हणजे, यापूर्वी त्यांना गडचिरोली जिल्हा आरोग्य विभागात नोकरीची संधी मिळाली होती. मात्र संशोधन आणि विज्ञान क्षेत्रात मोठे योगदान देण्याच्या ध्येयाने त्यांनी ती संधी स्वीकारली नाही. अखेर त्यांच्या गुणवत्तेच्या जोरावर भारत सरकारच्या केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळात वैज्ञानिक म्हणून निवड झाली.
शिशिर बोबाटे यांचे वडील मधुकर बोबाटे हे गोविंदराव मुनघाटे महाविद्यालयातून वरिष्ठ लिपिक पदावरून सेवानिवृत्त झाले असून, आई गृहिणी आहेत.
दुर्गम गडचिरोली जिल्ह्यातील एका विद्यार्थ्याने आपल्या जिद्द, मेहनत आणि गुणवत्तेच्या बळावर केंद्र सरकारच्या वैज्ञानिक पदापर्यंत मजल मारल्याने जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल दंडकारण्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे, शहर विकास मंचाचे पदाधिकारी, विविध सामाजिक संघटना, मित्रपरिवार आणि नागरिकांनी त्यांचे अभिनंदन करून भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन
Back to top button