आपला जिल्हाताज्या घडामोडी

मार्कंडा देवस्थानाच्या जीर्णोद्धाराला केंद्राची गती; डॉ. अशोक नेते यांच्या पाठपुराव्याला यश

भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे पत्र

गडचिरोली, प्रतिनिधी :-

गडचिरोली जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेल्या मार्कंडा देवस्थानाच्या संरक्षण व संवर्धनाच्या कामांना केंद्र सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला असून, मुख्य मंदिराच्या शिखराच्या जीर्णोद्धाराचे काम प्रगतिपथावर असल्याची माहिती भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (ASI) विभागाने दिली आहे. या कामासाठी माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाल्याचे मानले जात आहे.

दिल्ली येथील भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे महासंचालक यदुबीर सिंह रावत यांनी ३० जुलै २०२६ रोजी डॉ. नेते यांना पाठविलेल्या पत्रात मार्कंडा देवस्थानातील प्रलंबित संरक्षण व विकासकामांबाबत माहिती दिली आहे. डॉ. नेते यांनी १ जून २०२६ रोजी केलेल्या निवेदनाची दखल घेत आवश्यक कार्यवाही सुरू असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाकडून देशातील संरक्षित स्मारकांच्या संरक्षण, जतन व विकासासाठी विविध कामे नियमितपणे हाती घेतली जातात. त्याच अनुषंगाने मार्कंडा देवस्थानातील मुख्य मंदिराच्या शिखराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू असून, चालू आर्थिक वर्षात ते पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील संरक्षित स्मारकांच्या संरक्षणासाठी विभागाकडून सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचेही पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.

मार्कंडा देवस्थान हे गडचिरोली जिल्ह्याच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक ओळखीचे महत्त्वाचे प्रतीक मानले जाते. या वारसा स्थळाचे संवर्धन, संरक्षण आणि आवश्यक विकासकामे मार्गी लागावीत, यासाठी डॉ. अशोकजी नेते यांनी केंद्र सरकार आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानंतर केंद्राकडून मिळालेला सकारात्मक प्रतिसाद हा जिल्ह्याच्या ऐतिहासिक वारशाच्या जतनाच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

मुख्य मंदिराच्या शिखराच्या जीर्णोद्धाराला मिळालेली गती आणि उर्वरित संरक्षणात्मक कामेही लवकर माजी खासदार डॉ. अशोक नेते यांच्या प्रयत्नाने पूर्ण होतील, अशी अपेक्षा भाविक, इतिहासप्रेमी आणि स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. 

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker