आपला जिल्हाताज्या घडामोडी
गडचिरोलीत १३ नवजात बालके थोडक्यात बचावली
गडचिरोली महिला व बाल रुग्णालयातील घटना

गडचिरोली, प्रतिनिधी :-
जिल्हा मुख्यालयातील महिला व बाल रुग्णालयातील नवजात अतिदक्षता विभागात (NICU) शनिवारी सायंकाळी झालेल्या शॉर्टसर्किटमुळे विद्युत पॅनलला आग लागून काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. उपचाराधीन १३ नवजात बालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असला, तरी उपस्थित कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून अग्निशमन यंत्राच्या साहाय्याने आग तातडीने आटोक्यात आणल्याने संभाव्य मोठी दुर्घटना टळली.
रुग्णालय प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी सुमारे चारच्या सुमारास NICU विभागातील विद्युत पॅनलमध्ये शॉर्टसर्किट होऊन ठिणग्या उडाल्या आणि त्यातून आग लागली. त्याचवेळी रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याच्या सेवानिवृत्तीनिमित्त तळमजल्यावर निरोप समारंभ सुरू असल्याने अनेक कर्मचारी तेथे उपस्थित होते. आग लागलेल्या विभागात त्यावेळी केवळ काही कर्मचारी कार्यरत असल्याचे सांगितले जाते.
घटनेनंतर रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या गर्भवती महिला, नवजात बालकांचे पालक आणि नातेवाईकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. NICU विभागातील बालकांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. मात्र कर्मचाऱ्यांनी तातडीने अग्निशमन यंत्राचा वापर करून आग विझविल्याने ती इतरत्र पसरण्यापूर्वीच परिस्थिती नियंत्रणात आली.
या घटनेनंतर रुग्णालयातील सुरक्षाव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. संवेदनशील विभागात आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होते का, तसेच अशा आपत्कालीन परिस्थितीसाठी पुरेशी तयारी होती का, याबाबत रुग्णांच्या नातेवाईकांनी शंका उपस्थित केली आहे. वेळेत आग आटोक्यात आली नसती, तर गंभीर जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
रुग्णालयाच्या मुख्य अधीक्षक डॉ. माधुरी किरणाके यांनी शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची पुष्टी केली. कर्मचाऱ्यांनी तातडीने आग विझवून परिस्थिती नियंत्रणात आणली असून उपचाराधीन सर्व १३ नवजात बालके सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.




