आपला जिल्हाताज्या घडामोडी

कुरखेडात नदीत बुडून तीन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू

आंघोळीसाठी गेलेल्या चार विद्यार्थ्यांपैकी एक बचावला

कुरखेडा (गडचिरोली), प्रतिनिधी :-

कुरखेडा तालुक्यातील राणी (खेडेगाव) येथे शनिवारी (१ ऑगस्ट) दुपारी घडलेल्या हृदयद्रावक दुर्घटनेत सती नदीत बुडून तीन लहान विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण गावासह जिल्ह्यावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास आई-वडील धान रोवणीच्या कामासाठी शेतात गेले असताना गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चार विद्यार्थी आंघोळीसाठी सती नदीवर गेले होते. नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही खोल पाण्यात बुडाले. त्यांच्यासोबत असलेला एक विद्यार्थी मात्र सुदैवाने बचावला.

या दुर्घटनेत लक्ष्मण सुन्हेर दूधकवर (वय ६ वर्षे), कुणाल रमेश दूधकवर (वय ५ वर्षे) आणि मोहित हिवराज सराटे (वय ११ वर्षे) या तिन्ही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तिघेही रा. खेडेगाव, ता. कुरखेडा, जि. गडचिरोली येथील रहिवासी असून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खेडेगाव येथे शिक्षण घेत होते.

घटनेची माहिती मिळताच पुराडा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तसेच शोध व बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. आवश्यक पंचनामा व इतर कायदेशीर प्रक्रिया हाती घेण्यात आली असून बचाव व शोधकार्य तातडीने राबविण्यात आले.

या दुर्दैवी घटनेने खेडेगाव परिसरात शोकमय वातावरण निर्माण झाले असून निष्पाप चिमुकल्यांच्या अकाली निधनामुळे गावकऱ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नागरिकांनी पालकांना पावसाळ्यात नदी-नाले व जलाशयांजवळ मुलांना एकटे जाऊ न देण्याचे आवाहन केले आहे.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker