गडचिरोली, प्रतिनिधी :-
राज्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देणारे कर्जमाफी व वीजबिल थकबाकी माफीचे निर्णय हे ऐतिहासिक असून, मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने शेतकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य दिल्याचे प्रतिपादन माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी केले.
गडचिरोली येथील निवासी जनसंपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राज्य सरकारच्या शेतकरी कल्याणाशी संबंधित विविध निर्णयांची माहिती देण्यात आली.
डॉ. नेते यांनी सांगितले की, ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ अंतर्गत राज्यातील सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार ५८५ कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे. याशिवाय, शेतकऱ्यांच्या सुमारे ४८ हजार कोटी रुपयांच्या वीजबिल थकबाकीची माफी करून सरकारने मोठा दिलासा दिला आहे.
शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करून देणे, कृषी पंपांसाठी सुविधा वाढविणे, जलयुक्त शिवार अभियान, ‘मागेल त्याला शेततळे’ योजना, पीकविमा, कृषी सिंचन, कृषी यांत्रिकीकरण तसेच आधुनिक तंत्रज्ञान, ड्रोन आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा शेतीत वापर वाढविण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
कापूस, कांदा आणि सोयाबीन यांसारख्या पिकांच्या खरेदीसाठी शासनाने प्रभावी धोरण अवलंबले असून, बाजारातील चढ-उतारांपासून शेतकऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
“शेतकरी हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्याला कर्जाच्या ओझ्यातून मुक्त करून आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हे सरकारचे ध्येय असून, महायुती सरकार त्या दिशेने ठोस पावले उचलत आहे,” असे डॉ. अशोकजी नेते यांनी सांगितले.
या निर्णयांबद्दल महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महायुती सरकारचे अभिनंदन आणि आभार व्यक्त करताना, शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
पत्रकार परिषदेला भाजप जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, माजी आमदार डॉ. देवराव होळी, बाबुराव कोहळे, रमेश भुरसे, प्रमोद पिपरे, रेखा डोळस, प्रकाश गेडाम, डॉ. नितीन कोडवते, डॉ. चंदा कोडवते, अनिल कुनघाडकर, डॉ. भारत खटी, सीमा कन्नमवार, दत्तू सुत्रपवार, मधुकर भांडेकर, गोवर्धन चव्हाण, सुधाकर पेटकर, विलास भांडेकर, वर्षा शेडमाके, विनोद देवोजवार, सलीम शेख यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन
Back to top button