नागपूर,प्रतिनिधी :-
गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली येथील विश्वेश्वरराव आत्राम शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने उल्लेखनीय कामगिरी करत आदिवासी क्षेत्रातील राज्यातील उत्कृष्ट संस्था म्हणून प्रथम क्रमांक पटकावला आहे. या संस्थेला हा मानाचा पुरस्कार महामहीम उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
मुंबई येथील राजभवनात दिनांक २१ मार्च २०२६ रोजी आयोजित भव्य समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कौशल्य व उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा तसेच व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सतीश सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
संस्थेच्या वतीने हा पुरस्कार प्राचार्य वैभव बोंगीरवार यांनी स्वीकारला. यावेळी संस्थेतील प्रशिक्षणार्थी आदिवासी पारंपरिक वेशभूषेत उपस्थित राहून कार्यक्रमाला विशेष आकर्षण ठरले.
संस्थेने शैक्षणिक गुणवत्तेसोबतच कौशल्य विकास व रोजगारनिर्मितीतही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड या उद्योगसमूहात संस्थेतील ७८ प्रशिक्षणार्थ्यांना नियमित रोजगार मिळाला आहे. तसेच उत्पादनाभिमुख प्रशिक्षण योजनेअंतर्गत जवळपास ३ कोटी रुपयांची कामे पूर्ण करण्यात आली असून सुमारे १६ लाख रुपयांचा महसूल शासनास प्राप्त झाला आहे.
सामाजिक बांधिलकी जपत राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत भामरागड तालुक्यातील कोठी व पोयरकोठी या पूरग्रस्त गावांतील सुमारे २०० घरांना विद्युत सुविधा उपलब्ध करून देण्यात संस्थेने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
एकूणच, शैक्षणिक गुणवत्ता, कौशल्य प्रशिक्षण, रोजगारनिर्मिती आणि सामाजिक कार्य या सर्व क्षेत्रांत केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे या संस्थेला हा मानाचा पुरस्कार मिळाला असून गडचिरोली जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे.
Back to top button