गडचिरोली, प्रतिनिधी :-
गडचिरोली पोलीस स्टेशनच्या सायबर टीमने पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांचा विश्वास सार्थ ठरवत आणखी एक उल्लेखनीय कामगिरी केली आहे. केंद्रीय उपकरण ओळख नोंदणी (CEIR) पोर्टलच्या माध्यमातून शोध घेऊन तब्बल २१ हरवलेले मोबाईल फोन त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले. या मोबाईलची एकूण अंदाजित किंमत सुमारे ६ लाख रुपये आहे.
हरवलेले मोबाईल पुन्हा मिळाल्याने संबंधित नागरिकांनी गडचिरोली पोलिसांचे आणि विशेषतः पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत सायबर टीमचे आभार व्यक्त केले. अनेकांसाठी मोबाईल हा केवळ संवादाचे साधन नसून त्यामध्ये महत्त्वाची वैयक्तिक व शासकीय माहिती असल्याने तो परत मिळणे मोठा दिलासा ठरल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, मोबाईल हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास त्वरित जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून CEIR पोर्टलवर माहिती नोंदवावी. त्यामुळे हरवलेल्या मोबाईलचा शोध घेणे आणि तो परत मिळवून देणे अधिक सुलभ होते.
गडचिरोली पोलीस स्टेशनच्या सायबर टीमने सन २०२६ मध्ये आतापर्यंत एकूण ९० हरवलेले मोबाईल शोधून त्यांच्या मालकांना परत केले आहेत. ही कामगिरी गडचिरोली पोलिसांच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापराची आणि नागरिकाभिमुख कार्यपद्धतीची साक्ष देणारी असल्याचे मानले जात आहे.
Back to top button