आपला जिल्हाक्राईमताज्या घडामोडी
हरवलेला मोबाईल परत मिळाला; गडचिरोली पोलिसांच्या सायबर टीमने जिंकला नागरिकांचा विश्वास
पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली CEIR पोर्टलद्वारे २१ मोबाईल शोधून सुपूर्द

गडचिरोली,प्रतिनिधी :-
हरवलेला मोबाईल परत मिळणे अनेकांसाठी केवळ आशेचा विषय असतो. मात्र, गडचिरोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सायबर टीमने पुन्हा एकदा उल्लेखनीय कामगिरी करत CEIR (Central Equipment Identity Register) पोर्टलच्या माध्यमातून २१ हरवलेले मोबाईल फोन शोधून संबंधित नागरिकांना परत केले. या मोबाईलची एकूण अंदाजित किंमत सुमारे ६ लाख रुपये असून, हरवलेला मौल्यवान ऐवज परत मिळाल्याने नागरिकांनी गडचिरोली पोलिसांचे मनापासून आभार मानले.
गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये हरविलेल्या मोबाईलची तक्रार दाखल होताच त्याची CEIR पोर्टलवर तत्काळ नोंद केली जाते. त्यानंतर तांत्रिक विश्लेषण, सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि विविध यंत्रणांशी समन्वय साधून मोबाईलचा शोध घेण्याची प्रभावी प्रक्रिया राबविली जाते. या कार्यपद्धतीमुळे अनेक नागरिकांना त्यांचे हरवलेले मोबाईल पुन्हा मिळत आहेत.
या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक पूजा नैताम, महिला पोलीस हवालदार शिल्पा बनकर आणि महिला पोलीस शिपाई किरण रोहणकर यांनी विशेष परिश्रम घेत मोबाईलचा शोध लावण्यात मोलाची भूमिका बजावली.
विशेष म्हणजे, सन २०२६ मध्ये आतापर्यंत गडचिरोली पोलीस स्टेशनच्या सायबर टीमने तब्बल ९० हरवलेले मोबाईल शोधून नागरिकांना परत दिले आहेत. त्यामुळे गडचिरोली पोलिसांच्या तांत्रिक क्षमतेवर आणि तत्पर सेवाभावावर नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.
ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक एम. रमेश (भा.पो.से.), अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) जी. गोकुळराज (भा.पो.से.), अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सत्यसाई कार्तिक (भा.पो.से.) तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अनिकेत हिरडे (मा.पो.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
यावेळी पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, मोबाईल हरवल्यास विलंब न करता जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवावी. तातडीने तक्रार नोंद झाल्यास CEIR पोर्टलच्या माध्यमातून मोबाईल शोधण्याची शक्यता अधिक वाढते.



