ताज्या घडामोडीदेश विदेश

पूल खचल्याप्रकरणी स्वतंत्र चौकशीची काँग्रेसची मागणी

ठेकेदार वर कारवाईची करा - विश्वजीत कोवासे

गडचिरोली, प्रतिनिधी :-

एटापल्ली तालुक्यातील महाराष्ट्र-छत्तीसगडला जोडणारा कोठी-कोरनार पूल अवघ्या तीन वर्षांत खचल्याच्या घटनेची स्वतंत्र तांत्रिक चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष अॅड. विश्वजीत मारोतराव कोवासे यांनी केली आहे.

यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात अॅड. कोवासे यांनी सांगितले की, सदर पुलाचे उद्घाटन तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले होते. मात्र, उद्घाटनानंतर अवघ्या तीन वर्षांतच पुलाची झालेली दुरवस्था ही अत्यंत गंभीर बाब असून सार्वजनिक निधीच्या वापराबाबत अनेक प्रश्न निर्माण करणारी आहे.

गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्यात विकासकामांचे मोठे दावे केले जात असताना दुसरीकडे कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेले पूल इतक्या कमी कालावधीत खचणे हे निकृष्ट दर्जाच्या कामाचे द्योतक असल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणात बांधकामाची गुणवत्ता, देखरेख आणि संबंधित यंत्रणांच्या भूमिकेची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

अॅड. कोवासे यांनी या प्रकरणाची स्वतंत्र तांत्रिक चौकशी व गुणवत्ता तपासणी (ऑडिट) करण्याची मागणी केली आहे. चौकशीत दोषी आढळणाऱ्या ठेकेदाराचा परवाना रद्द करून संबंधित अधिकारी व अभियंत्यांवर कठोर प्रशासकीय आणि फौजदारी कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

“जनतेच्या कराच्या पैशातून उभारण्यात आलेल्या विकासकामांची गुणवत्ता सर्वोच्च असली पाहिजे. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी जबाबदारांवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे,” असे अॅड. विश्वजीत कोवासे यांनी म्हटले आहे.

या प्रकरणात शासनाने तातडीने हस्तक्षेप करून सत्य परिस्थिती जनतेसमोर आणावी आणि दोषींना पाठीशी न घालता कठोर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker