आपला जिल्हाताज्या घडामोडी
गडचिरोलीत पोलीस शिपाई भरतीची लेखी परीक्षा शांततेत संपन्न
९९.५४ टक्के उमेदवारांची उपस्थिती; २४ तासांत आक्षेप नोंदविण्याची मुदत

गडचिरोली, प्रतिनिधी :-
गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई भरती २०२४-२५ (प्रत्यक्ष भरती २०२६) अंतर्गत आज २२ मार्च २०२६ रोजी घेण्यात आलेली लेखी परीक्षा अत्यंत शिस्तबद्ध व पारदर्शक पद्धतीने पार पडली. ७१७ पदांसाठी सुरू असलेल्या या भरती प्रक्रियेत लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या ७००३ उमेदवारांपैकी तब्बल ६९७१ उमेदवारांनी परीक्षा दिली, म्हणजेच ९९.५४ टक्के उपस्थिती नोंदवली गेली.
सकाळी १० ते ११.३० या वेळेत सामान्य अध्ययनाचा पहिला पेपर, तर दुपारी १ ते २.३० या वेळेत गोंडी व माडिया विषयाचा दुसरा पेपर घेण्यात आला. ही परीक्षा शहरातील एकूण १४ केंद्रांवर आयोजित करण्यात आली होती.

परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी १६६ अधिकारी, ६९३ पोलीस कर्मचारी आणि १३२ शिक्षक व कर्मचारी असे एकूण सुमारे १००० मनुष्यबळ तैनात करण्यात आले होते. सर्व केंद्रांवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
उमेदवारांच्या सोयीसाठी परीक्षा केंद्रांचे नकाशे आणि बैठक व्यवस्था सामाजिक माध्यमांद्वारे उपलब्ध करून देण्यात आली होती. गैरप्रकार टाळण्यासाठी उमेदवारांची मेटल तपासणी, बायोमेट्रिक पडताळणी करण्यात आली. काही केंद्रांवर संकेत अडथळा यंत्राचाही वापर करण्यात आला.
दरम्यान, दोन्ही पेपरच्या उत्तरपत्रिका दुपारी ३.१५ वाजता पोलीस दलाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या असून उमेदवारांना २४ तासांच्या आत आक्षेप नोंदविण्याची संधी देण्यात आली आहे.
ही संपूर्ण प्रक्रिया पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश, कार्तिक मधीरा, गोकुल राज तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडली.
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन [totalpoll id="3140"]



