महावितरणकडून वीज ग्राहकांवर होत असलेल्या कथित मनमानी, बेजबाबदार व ग्राहकविरोधी कारभाराच्या निषेधार्थ आजाद समाज पार्टी आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी (माकप) यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दि. २५ जून २०२६ रोजी दुपारी १२ वाजता पोटेगाव रोड येथील महावितरणच्या अभियंता कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
पक्षाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गडचिरोली जिल्ह्यातील अनेक वीज ग्राहकांकडून महावितरणच्या कामकाजाबाबत सातत्याने गंभीर तक्रारी प्राप्त होत आहेत. नियमितपणे ₹५०० ते ₹१००० पर्यंत वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांना अचानक दुप्पट अथवा अवाजवी बिले पाठविण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच प्रत्यक्ष मीटर रीडिंग न घेता अंदाजे व मनमानी बिल आकारणे, पुढील महिन्यात त्याची योग्य दुरुस्ती न करणे आणि स्मार्ट मीटरला विरोध असतानाही ग्राहकांवर जबरदस्तीने स्मार्ट मीटर लादण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
याशिवाय ग्राहकांच्या तक्रारींचे वेळेत निवारण होत नसून संबंधित कार्यालयांकडून समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. महावितरणच्या निष्काळजी व चुकीच्या कारभारामुळे ग्राहकांना आर्थिक, मानसिक आणि प्रशासकीय त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान अवाजवी व अंदाजे वीज बिलांची चौकशी करणे, चुकीची बिले तात्काळ दुरुस्त करणे, अंदाजे बिल देण्याची पद्धत बंद करणे, स्मार्ट मीटर बसविताना ग्राहकांची संमती घेणे तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करणे आदी प्रमुख मागण्या करण्यात येणार आहेत.
तसेच आंदोलनाच्या दिवशी महावितरणचे अधीक्षक अभियंता यांनी स्वतः उपस्थित राहून ग्राहकांच्या प्रश्नांवर स्पष्ट भूमिका मांडावी व लेखी आश्वासन द्यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. अन्यथा ग्राहकांच्या हितासाठी यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आजाद समाज पार्टी आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीने दिला आहे.
वीज बिल, स्मार्ट मीटर, अंदाजे बिल अथवा महावितरणच्या कारभाराबाबत तक्रारी असलेल्या सर्व ग्राहकांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.