गडचिरोली, प्रतिनिधी :-
गडचिरोली शहर व जिल्ह्यातील वाढत्या आरोग्य गरजांचा विचार करता नगर परिषदेसाठी दोन अत्याधुनिक रुग्णवाहिका तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशी ठाम मागणी गडचिरोलीच्या नगराध्यक्ष अॅड. प्रणोती सागर निबोंरकर यांनी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे केली.
मंत्री आबिटकर यांच्या गडचिरोली दौऱ्यादरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे आयोजित आरोग्य सेवेच्या आढावा बैठकीत नगराध्यक्षांनी ही मागणी जोरदारपणे मांडली. सध्या उपलब्ध रुग्णवाहिका अपुऱ्या पडत असून आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वेळेत सेवा मिळण्यात अडचणी निर्माण होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी जिल्हा रुग्णालयातील सुविधा, वैद्यकीय मनुष्यबळाची कमतरता, औषधसाठ्याची उपलब्धता तसेच ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांची स्थिती याकडेही मंत्र्यांचे लक्ष वेधले. दुर्गम व नक्षलग्रस्त भागामुळे गडचिरोली जिल्ह्यात सक्षम व तत्पर आरोग्य सेवा अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
अपघातग्रस्त, गंभीर रुग्ण तसेच गर्भवती महिलांना तातडीने उच्चस्तरीय उपचारासाठी हलविण्यासाठी सुसज्ज रुग्णवाहिका गरजेची असल्याचे सांगत दोन नव्या रुग्णवाहिका मिळाल्यास आपत्कालीन सेवा अधिक प्रभावी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, संबंधित मागण्यांचा सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन आरोग्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली असून, या बैठकीमुळे जिल्ह्यातील आरोग्य सुविधा मजबूत करण्यास गती मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
Back to top button