ताज्या घडामोडी

करमाफी दिल्यास पालिकेला २५५ कोटींचा फटका

पुणे, प्रतिनिधी :-

पुणे शहरातील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मिळकत कर माफ करण्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतल्यास तब्बल ४ लाख २९ हजार २४५ मिळकतधारकांना थेट लाभ होणार आहे. मात्र, या निर्णयामुळे महापालिकेच्या वार्षिक उत्पन्नात सुमारे २५५ कोटी रुपयांची घट होण्याची शक्यता आहे.

पुणे महापालिका निवडणुकीदरम्यान सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी आपल्या जाहीरनाम्यात ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मिळकत करमाफी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आता हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.

महापालिका प्रशासनाच्या माहितीनुसार, पुणे शहरात एकूण १२ लाख ६९ हजार १६३ निवासी मिळकती असून, त्यापैकी ४ लाखांहून अधिक घरे ही ५०० चौरस फुटांपर्यंतची आहेत. या सर्व मिळकतींना पूर्ण करमाफी दिल्यास पालिकेच्या आर्थिक नियोजनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

एकीकडे सामान्य नागरिकांना दिलासा देण्याचा मुद्दा महत्त्वाचा असला, तरी दुसरीकडे पालिकेच्या विकासकामांवर, पायाभूत सुविधांवर व सेवा योजनांवर याचा परिणाम होऊ शकतो, अशी चिंता प्रशासन स्तरावर व्यक्त केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर मिळकत करमाफीचा निर्णय घेताना नागरिकहित आणि आर्थिक संतुलन या दोन्ही बाबींचा समतोल साधणे महापालिकेसमोर मोठे आव्हान ठरणार आहे.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker