ताज्या घडामोडीदेश विदेश

आणखी दोन माओवादी ठार, C-60 जवान दिपक मडावी यांना वीरमरण

गडचिरोली, प्रतिनिधी :-

भामरागड तालुक्यातील जंगल परिसरात सुरू असलेल्या माओवादीविरोधी कारवाईदरम्यान आज सकाळी आणखी दोन माओवादी (१ पुरुष व १ महिला) यांचे मृतदेह हस्तगत करण्यात आले. यामुळे आतापर्यंत ठार झालेल्या माओवाद्यांची संख्या तीन (२ पुरुष व १ महिला) झाली आहे. घटनास्थळावरून १ एके-४७ आणि १ एसएलआर अशी शस्त्रे जप्त करण्यात आली असून ठार झालेल्या तिन्ही माओवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.

दरम्यान, या चकमकीत गंभीर जखमी झालेल्या C-60 पथकातील जवान दिपक चिन्ना मडावी (वय ३८) यांना हेलिकॉप्टरच्या मदतीने अबुझमाड येथील घनदाट जंगलातून बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालय, भामरागड येथे दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असून त्यांना वीरमरण आले आहे. ते सध्या अहेरी येथे वास्तव्यास होते व त्यांचे मूळ गाव मांड्रा, दामरांचा (ता. अहेरी) आहे.

याच कारवाईदरम्यान जोगा मडावी (रा. किष्टयापल्ली) हे देखील गोळी लागून जखमी झाले होते. त्यांना हेलिकॉप्टरच्या सहाय्याने बाहेर काढून भामरागड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्यांना पुढील उपचारासाठी लवकरच गडचिरोली येथे हलविण्यात येणार आहे.

दरम्यान, संबंधित जंगल परिसरात सुरक्षा दलांची शोधमोहीम अद्याप सुरू असून गडचिरोली पोलीस दलाकडून पुढील माहिती नंतर जाहीर करण्यात येणार आहे.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker