ताज्या घडामोडीदेश विदेश
ऑपरेशन ‘अंतिम प्रहार’ अंतर्गत पुन्हा मोठी कारवाई; माओवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त
आंतरराज्यीय अभियानादरम्यान मोठ्या प्रमाणात शस्त्रनिर्मिती साहित्य नष्ट

गडचिरोली, प्रतिनिधी :-
आत्मसमर्पित माओवाद्यांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे राबविण्यात आलेल्या आंतरराज्यीय अभियानादरम्यान गडचिरोली पोलिसांनी पुन्हा एकदा मोठी कारवाई करत माओवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त केला आहे. ‘ऑपरेशन अंतिम प्रहार’ अंतर्गत करण्यात आलेल्या या कारवाईत 01 नग इन्सास रायफल, 02 नग सिंगल शॉट रायफल, 02 नग 12 बोअर रायफल तसेच एकूण 18 जीवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली असून घटनास्थळीच मोठ्या प्रमाणातील माओवादी साहित्य नष्ट करण्यात आले आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील माओवादी चळवळ आता जवळपास संपुष्टात आली असली तरी सुरक्षा दलांना लक्ष्य करण्यासाठी माओवाद्यांकडून जंगल परिसरात शस्त्र व स्फोटक साहित्य गुप्तपणे लपवून ठेवले जात असल्याचे तपासात समोर आले आहे. आंतरराज्यीय सीमावर्ती दुर्गम जंगलांचा फायदा घेत हे साहित्य तयार करून जमीनीखाली लपवून ठेवले जात होते. नक्षल सप्ताह, निवडणुका किंवा इतर संवेदनशील काळात सुरक्षा दलांवर हल्ले करण्यासाठी या साहित्याचा वापर केला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
यापूर्वी दि. 23 मे 2026 रोजी करण्यात आलेल्या कारवाईनंतर दि. 27 मे 2026 रोजी पुन्हा प्रभावी मोहीम राबवून जंगल परिसरात लपवून ठेवलेले साहित्य हस्तगत करण्यात गडचिरोली पोलीस दल यांना यश आले आहे.
आत्मसमर्पित माओवाद्यांच्या माहितीवरून कारवाई
गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांची सखोल चौकशी करण्यात आली असता, पोस्टे काकूर, जिल्हा नारायणपूर येथून सुमारे 07 किलोमीटर अंतरावर महाराष्ट्र–छत्तीसगड सीमेलगतच्या जंगल परिसरात शस्त्र आणि शस्त्रनिर्मितीसाठी लागणारे साहित्य लपवून ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली होती.
या माहितीच्या आधारे दि. 26 मे 2026 रोजी पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त आंतरराज्यीय अभियान राबविण्यात आले. या अभियानात विशेष अभियान पथक प्राणहिता येथील चार तुकड्या, डीआरजी नारायणपूरचे एक पथक तसेच बीडीडीएस प्राणहिताचे दोन पथक सहभागी झाले होते.
दि. 27 मे रोजी पोस्टे काकूर परिसरातील जंगलात कसून शोधमोहीम राबविण्यात आली. बीडीडीएस पथकाने तपासणी केली असता मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा आणि शस्त्रनिर्मिती साहित्य आढळून आले.
मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत

या कारवाईत पोलिसांनी 01 इन्सास रायफल, 02 सिंगल शॉट रायफल, 02 नग 12 बोअर रायफल, एसएलआर रायफलची 02 जिवंत काडतुसे, .303 रायफलची 12 जिवंत काडतुसे, 12 बोअर रायफलची 04 काडतुसे, 25 किलो आयईडी स्फोटक, 02 क्लेमोर, 110 डेटोनेटर, कॉर्टेक्स वायर, 500 पेक्षा अधिक बीजीएल सेल, 07 बीजीएल लाँचर, 03 ट्यूब लाँचर, लोखंडी सळ्या तसेच शस्त्रनिर्मितीसाठी लागणारी 02 लेथ मशीन, 02 मोटार, ग्राइंडर मशीन, इन्व्हर्टर, बॅटरी, वायर बंडल आणि सोलर प्लेट यांसारखे साहित्य जप्त केले.



