आपला जिल्हा

वाहतूक शिस्त मोहीम: पोलिसांचे कौतुक, पालकांनीही घ्यावी जबाबदारी

उदय धकाते, गडचिरोली :-

गडचिरोली शहरात अल्पवयीन मुलांकडून होणाऱ्या वाहतूक नियमांच्या उल्लंघनावर कठोर कारवाई करणाऱ्या पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. अपघातांचे वाढते प्रमाण कमी करण्यासाठी पोलिसांनी राबवलेल्या या मोहिमेचे नागरिकांनी स्वागत केले असून, भविष्यात या कारवाईचे सकारात्मक परिणाम दिसतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

२४ पालकांवर गुन्हे दाखल:-

पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या सूचनेनुसार शहरातील पाच ठिकाणी विशेष नाकाबंदी मोहीम राबवण्यात आली. तपासणीदरम्यान परवाना नसतानाही दुचाकी चालवणारे अल्पवयीन मुले आढळली. त्यांच्या पालकांवर मोटार वाहन (सुधारणा) अधिनियम २०१९ कलम १९९(अ) नुसार गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईत एकूण २४ पालकांवर गुन्हे नोंदविण्यात आले असून, दुचाकी वाहने तात्काळ जप्त करण्यात आली आहेत.

कारवाईचे कारण आणि परिणाम:- 

गेल्या काही महिन्यांत शहरात अल्पवयीन मुलांकडून होणाऱ्या अपघातांचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. वाहतूक नियमांची जाण नसल्यामुळे रस्त्यावर इतर वाहनचालकांनाही धोका निर्माण होतो. या कारवाईमुळे नागरिकांत वाहतूक नियमांची गांभीर्याने अंमलबजावणी व्हावी, हा पोलिसांचा उद्देश स्पष्ट झाला आहे.

पोलिसांचे कौतुक :-

शहरातील सामाजिक संघटना, नागरिक व शिक्षकांनी या कारवाईचे समर्थन केले आहे. “अनेक पालक अपघाताची जबाबदारी मुलांवर ढकलतात, परंतु अल्पवयीन मुलांना वाहन देणारेही तेच असतात. पोलिसांनी घेतलेली ही भूमिका योग्य आहे,” असे मत नागरिकांनी व्यक्त केले.

पालकांनी घ्यावयाची काळजी:-

मुलांच्या वयाची व परवान्याची खात्री केल्याशिवाय वाहन देऊ नये.

वाहन वापरण्यापूर्वी मुलांना रस्ते सुरक्षा व वाहतूक नियम शिकवावेत.

हेल्मेट, सिग्नल, वेग मर्यादा यांचे पालन करण्यास प्रवृत्त करावे.

अपघातानंतर होणारे कायदेशीर व आर्थिक परिणाम स्पष्ट करावेत.

शाळा, महाविद्यालय व पोलिसांनी संयुक्तपणे जागरूकता शिबिरे घ्यावीत.

कठोर शिक्षेची तरतूद:-

मोटार वाहन (सुधारणा) अधिनियमानुसार दोषी पालकांना तीन वर्षांपर्यंत कारावास व २५,००० रुपये दंडाची तरतूद आहे. तसेच बालकाविरुद्ध बाल न्याय अधिनियम २०१५ नुसार स्वतंत्र खटला चालवता येतो. त्यामुळे ही कारवाई केवळ तात्पुरती धास्ती नसून, दीर्घकाळ अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी महत्त्वाची आहे.

पोलिसांचे आवाहन :-

पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले की, “सर्वच पालकांनी जबाबदारीने वागून मुलांना वाहन चालविण्यापासून परावृत्त करावे. वाहतूक नियम पाळल्यास अनेकांचे प्राण वाचू शकतात.”

या मोहिमेत अपर पोलीस अधीक्षक सत्य साई कार्तिक, गोकुळ राज जी., उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. विनोद चव्हाण, सपोनि. शरद मेश्राम आणि गडचिरोली पोलीस ठाण्याचे कर्मचारी सहभागी झाले होते. भविष्यात अशा कारवाई आणखी तीव्र करण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker