गडचिरोली, प्रतिनिधी :-
भारतीय हवामान विभागाने गडचिरोली जिल्ह्यासाठी २९ जुलै २०२६ रोजी रेड अलर्ट आणि ३० जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी केल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि प्रशिक्षण संस्थांना बुधवार, २९ जुलै रोजी सुटी जाहीर करण्यात आली आहे. हा निर्णय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अविश्यांत पंडा यांनी घेतला आहे.
हवामान विभागाने जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला असून, वैनगंगा, गोदावरी, प्राणहिता, बांडिया आणि इंद्रावती नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची तसेच नाले-नाल्यांना पूर येण्याची शक्यता व्यक्त केली आहे. संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सर्व अंगणवाड्या, शासकीय व खासगी प्राथमिक-माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद व नगरपालिका शाळा, अनुदानित व विनाअनुदानित शाळा, आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) तसेच इतर व्यावसायिक प्रशिक्षण संस्थांना ही सुटी लागू राहणार आहे.
दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना हवामान विभागाच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे, अनावश्यक प्रवास टाळण्याचे तसेच नदी-नाले आणि पूरग्रस्त भागांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.
आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ तसेच इतर लागू कायद्यांनुसार या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन
Back to top button