गडचिरोली, प्रतिनिधी :
कारगिल युद्धातील शहीद वीर जवानांच्या शौर्य, पराक्रम आणि सर्वोच्च बलिदानाला अभिवादन करण्यासाठी गडचिरोलीतील कारगिल चौक येथे २७ वा कारगिल विजय दिवस उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना, आजी-माजी सैनिक संघटना आणि कारगिल चौक दुर्गा उत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या कार्यक्रमात कारगिल स्मारक समितीचे संस्थापक उदय धकाते यांच्या २२ वर्षांच्या अथक संघर्षाचे विशेष कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात गांधी चौक ते कारगिल चौक या मार्गावर काढण्यात आलेल्या भव्य कारगिल विजय रॅलीने झाली. त्यानंतर कारगिल स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून शहीद जवानांना मानवंदना देण्यात आली. एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध संचलन आणि कवायत सादर केली. सहभागी विद्यार्थ्यांना आयोजकांच्या वतीने नोटबुकचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमात वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी, शहीद जवानांच्या कुटुंबीयांसह विविध पुरस्कारप्राप्त माजी सैनिकांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

प्रमुख अतिथी भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्षा सौ. योगिताताई पिपरे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “उदय धकाते यांनी कारगिल स्मारक उभारण्यासाठी अनेक वर्षे सातत्याने पाठपुरावा केला. मी नगराध्यक्ष असताना त्यांच्या मागणीची दखल घेत नगर परिषदेत ठराव मंजूर करून निधी उपलब्ध करून दिला. तब्बल २२ वर्षे रखडलेले कारगिल स्मारक माझ्या कार्यकाळात पूर्णत्वास आले, याचा आनंद आहे.”
त्या पुढे म्हणाल्या, “कारगिल विजय दिवस हा प्रत्येक भारतीयाच्या अभिमानाचा दिवस आहे. कारगिल युद्धातील जवानांचे शौर्य, राष्ट्रनिष्ठा आणि बलिदान हे प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. वीरमाता, वीरपत्नी आणि सैनिकांच्या कुटुंबीयांचे योगदानही तितकेच महान असून नव्या पिढीने त्यांच्या त्यागातून राष्ट्रप्रेम, शिस्त आणि कर्तव्यनिष्ठेची प्रेरणा घ्यावी.”
यावेळी त्यांनी भारत-बांगलादेश सीमेवर कर्तव्य बजावताना वीरमरण आलेले कुरखेडा तालुक्यातील मरारटोला येथील जवान सुरेश आंबाडरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
या कार्यक्रमाला माजी खासदार डॉ. अशोक नेते, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, नगराध्यक्षा अॅड. प्रणोती निंबोरकर, लॉयड्स मेटल्सचे प्रतिनिधी लेफ्टनंट कर्नल रामनाथ स्वामी, महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे संचालक इंजि. प्रमोद पिपरे, कारगिल स्मारक समितीचे संस्थापक उदय धकाते, शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष होमराज डोनाळकर, कारगिल समितीचे अध्यक्ष ऋषी वंजारी, वीरपत्नी सुधाताई चंदनखेडे, चंदाताई राऊत, घिसूलाल काबरा, चंद्रशेखर भंडागे, पांडुरंग खरागे यांच्यासह आजी-माजी सैनिक, वीरपरिवार, लोकप्रतिनिधी आणि देशभक्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मेजर वालदे यांनी केले, तर मेजर वासेकर यांनी आभार मानले. राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत तसेच **”वंदे मातरम्”, “भारत माता की जय” आणि “भारतीय सैन्य दल झिंदाबाद”**च्या घोषणांनी कार्यक्रमाची सांगता झाली. संपूर्ण परिसर देशभक्तीच्या उत्साहाने भारावून गेला.
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन
Back to top button