ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
शिक्षक परिषदेच्या प्रांत कार्यकारिणीची व्यापक बैठक उत्साहात संपन्न

नागपूर, प्रतिनिधी :-
अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ संलग्न महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्राथमिक विभाग) यांच्या प्रांत कार्यकारिणीची दोन दिवसीय व्यापक बैठक नागपूर येथील आमदार निवास, सिव्हिल लाईन येथे प्रांताध्यक्ष मधुकर उन्हाळे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. बैठकीचे उद्घाटन महासंघाचे अतिरिक्त महामंत्री मोहन पुरोहित यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून नागपूर शिक्षक सहकारी बँकेचे अध्यक्ष अनिल सोले उपस्थित होते. व्यासपीठावर राष्ट्रीय सचिव प्रा. डॉ. प्रदीप खेडकर, प्रांत कार्यवाह पुरुषोत्तम काळे, प्रांत संघटन मंत्री सुरेश दंडवते आणि प्रांत कार्याध्यक्ष मच्छिंद्र गुरमे यांची प्रमुख उपस्थिती होती.
महाराष्ट्रातील १६ जिल्ह्यांतील ६४ पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सहभागाने झालेल्या या बैठकीत सात सत्रांद्वारे संघटन विस्तार, सभासद नोंदणी, शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांचा पाठपुरावा, आगामी त्रैवार्षिक अधिवेशनाचे नियोजन तसेच राष्ट्रीय कार्यक्रमांच्या अंमलबजावणीवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
अतिरिक्त महामंत्री मोहन पुरोहित यांनी “आदर्श कार्यकर्त्याचे गुण” आणि “संघटन विस्तारासाठी बैठक व प्रवासाचे महत्त्व” या विषयांवर मार्गदर्शन केले. राष्ट्रीय सचिव प्रा. डॉ. प्रदीप खेडकर यांनी गुरुपौर्णिमा उपक्रम, १२ ते २३ जानेवारीदरम्यान होणारे राष्ट्रीय कार्यक्रम आणि राज्यस्तरीय अधिवेशनाच्या तयारीबाबत माहिती दिली.
बैठकीत यंदा १० हजार सभासद नोंदणीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. तसेच ३१ ऑगस्टपर्यंत सर्व जिल्हा बैठका पूर्ण करून संघटन विस्तार व सभासद नोंदणी अभियान प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांचे संकलन करून शिक्षण संचालक, शालेय शिक्षण विभाग, ग्रामविकास विभाग आणि संबंधित मंत्रालयांकडे प्रभावी पाठपुरावा करण्याचाही निर्धार व्यक्त करण्यात आला.
यावेळी संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या ६५० व्या जयंतीनिमित्त प्रकाशित जीवनचरित्र पुस्तिकेचे उपस्थितांना मोफत वितरण करण्यात आले. या उपक्रमासाठी प्रत्येकी ५० पुस्तिकांचे प्रायोजकत्व स्वीकारणारे प्रांत उपाध्यक्ष अवधूत वानखेडे, यवतमाळ जिल्हाध्यक्ष नरेश खडतरे आणि गडचिरोली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष आशिष धात्रक यांचा विशेष सत्कार करण्यात आला.




