गडचिरोली, प्रतिनिधी :-
माओवादी असल्याचे भासवून बॅनर व पत्रके लावून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील अन्य संशयितांचा शोध सुरू असून, तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
१२ जुलै रोजी पिपली बुर्गी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जिजावंडी टोलाकडे जाणाऱ्या मार्गावरील फाट्याजवळ गावाच्या दिशादर्शक फलकाला लाल रंगाचा कापडी बॅनर लावलेला आढळून आला. तसेच परिसरात दोन पत्रकेही सापडली. या बॅनर व पत्रकांवरील मजकुरातून माओवादी संघटनेच्या नावाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले.
घटनेची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाने तपास सुरू केला. तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे शिवा अनिल मिस्त्री (वय ४८, रा. तरुणनगर, ता. पाखांजूर, जि. कांकेर, छत्तीसगड) आणि रोहित रंजीत मल्लीक (वय २५, रा. वटेली, ता. एटापल्ली, जि. गडचिरोली) यांना अटक करण्यात आली. या दोघांनी माओवादी असल्याचे भासवून बॅनर व पत्रके लावल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी पिपली बुर्गी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह बेकायदा कृत्य (प्रतिबंध) अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कटात सहभागी असलेल्या इतर संशयितांचा शोध सुरू आहे.
गडचिरोली जिल्ह्यात माओवादी कारवाया प्रभावी पोलिसी मोहिमांमुळे संपुष्टात आल्याचा पुनरुच्चार करत, नागरिकांनी कोणत्याही अफवा किंवा दिशाभूल करणाऱ्या कृत्यांवर विश्वास ठेवू नये तसेच संशयास्पद हालचालींची माहिती तातडीने पोलिसांना द्यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी केले आहे.
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन
Back to top button