आपला जिल्हाताज्या घडामोडी
लाठीचार्जच्या निषेधार्थ गडचिरोली बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
शाळा, महाविद्यालये व व्यापारी प्रतिष्ठाने बंद

गडचिरोली, प्रतिनिधी :-
दिल्ली येथे संसद भवनाकडे निघालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ गुरुवारी गडचिरोली जिल्ह्यात पुकारण्यात आलेल्या सर्वपक्षीय बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील अनेक शाळा, महाविद्यालये आणि व्यापारी प्रतिष्ठाने दिवसभर बंद ठेवण्यात आली. गांधी चौक येथे धरणे आंदोलन करण्यात आले.
आंदोलनादरम्यान विद्यार्थी प्रतिनिधी तसेच विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करत NEET प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे बाळू टेम्भूर्णे, जिल्हाध्यक्ष प्रशांत देव्हारे, जी. के. बारसिंगे, शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते व जयश्री जराते, आजाद समाज पार्टीचे प्रदेश सचिव धर्मानंद मेश्राम, जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, महिला जिल्हाध्यक्षा सोनाशी लभाने, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष पवन गेडाम, रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत, हंसराज उंदीरवाडे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. देवराव चवळे, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे मिलिंद बांबोळे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डॉ. धर्मराज सोरदे, टायगर सेनेचे चंद्रशाह उईके तसेच सामाजिक कार्यकर्ते गौतम मेश्राम, विलास निंबोरकर, सूरज पीपरे, चंद्रकांत भोयर, प्रतीक डांगे, प्रितेश अंबादे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व नागरिक सहभागी झाले.
आंदोलनादरम्यान पोलिसांकडून दबावाचा आरोप
आंदोलनादरम्यान काही आंदोलकांनी पोलिस प्रशासनावर दबाव टाकल्याचा आरोप केला. आंदोलकांच्या म्हणण्यानुसार, आंदोलनाची माहिती प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचवत असलेल्या काही विद्यार्थी प्रतिनिधींना पोलीस अधिकाऱ्यांनी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून दबाव आणल्याचा आरोप करण्यात आला.
तसेच, काही शिक्षकांनी शाळांना सुट्टी झाल्यानंतर पालक म्हणून आंदोलनात सहभाग घेतला असता, संबंधित पोलीस निरीक्षकांनी त्यांच्या शाळेच्या प्राचार्यांचा संपर्क क्रमांक मागून कारवाईची भाषा केल्याचा आरोपही करण्यात आला. आंदोलक शिक्षकांनी, “आम्हालाही संविधानाने शांततापूर्ण आंदोलन करण्याचा अधिकार दिला आहे. आम्ही पालक म्हणून आंदोलनात सहभागी झालो असून येथे कोणत्याही पक्षाचा झेंडा किंवा बॅनर नव्हता,” अशी भूमिका मांडली.
या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात येणार असून, आंदोलनात सहभागी नागरिकांना कथितरीत्या धमकावल्याच्या प्रकाराची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले.
पोलिसांकडून करण्यात आल्याचा दावा असलेल्या वर्तनाबाबतचा उल्लेख आंदोलकांनी केलेल्या आरोपांवर आधारित असून, यासंदर्भात पोलीस प्रशासनाची अधिकृत भूमिका उपलब्ध झालेली नाही.


