गडचिरोली, प्रतिनिधी :-
राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे कॅन्सर आणि इतर गंभीर आजारांवरील शस्त्रक्रिया स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्याच्या दिलेल्या सूचनांना मोठे यश मिळाले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथील वैद्यकीय पथकाने एका पाठोपाठ दोन अत्यंत गुंतागुंतीच्या अंडाशयाच्या गाठींच्या (Ovarian Tumor) शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडल्या आहेत.
या यशामुळे दुर्गम भागातील रुग्णांना नागपूर किंवा इतर महानगरांमध्ये न जाता गडचिरोलीतच मोफत आणि उच्च दर्जाचे उपचार उपलब्ध होत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
६५ वर्षीय महिलेवर यशस्वी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया:-
जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या ६५ वर्षीय महिलेच्या पोटात अंडाशयाची मोठी गाठ असल्याचे निदान झाले होते. रुग्णाचे वाढते वय आणि गाठीची जटिलता लक्षात घेता ही शस्त्रक्रिया अत्यंत आव्हानात्मक मानली जात होती.
स्त्रीरोग तज्ज्ञ तथा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली. या शस्त्रक्रियेसाठी डॉ. आकाश, डॉ. शरद आणि डॉ. मानसी यांनी सहकार्य केले.
भूलतज्ज्ञ डॉ. मित्तल आणि डॉ. सुकेशनी यांनी शस्त्रक्रियेदरम्यान महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. तसेच ऑपरेशन थिएटर इन्चार्ज माधुरी गेडाम व किरण सिस्टर यांनीही महत्त्वपूर्ण योगदान दिले. शस्त्रक्रियेनंतर संबंधित महिलेची प्रकृती स्थिर असून त्यांच्यात वेगाने सुधारणा होत आहे.
२६ वर्षीय तरुणीच्या दुर्मिळ कॅन्सरयुक्त गाठीवर मात:-
याच मोहिमेअंतर्गत ग्रामीण रुग्णालय धानोरा येथून संदर्भित करण्यात आलेल्या २६ वर्षीय महिला रुग्णावर जिल्हा रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी अत्यंत क्लिष्ट शस्त्रक्रिया केली.
महिला रुग्णाच्या पोटात तीव्र वेदना होत होत्या आणि तिच्या पोटात साधारण २४ आठवड्यांच्या गर्भावस्थेइतकी मोठी गाठ जाणवत होती. सीटी स्कॅन आणि सोनोग्राफी तपासणीत उजव्या अंडाशयामध्ये घन व द्रवरूप मिश्रित मोठी गाठ असल्याचे निष्पन्न झाले होते. सुरुवातीला ‘ट्युबो-ओव्हेरियन ॲब्सेस’ असण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली होती.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वैद्यकीय पथकाने तातडीने ‘एक्स्प्लोरेटरी लॅप्रोटोमी आणि उजवे अंडाशय काढून टाकण्याची शस्त्रक्रिया’ यशस्वीरीत्या पार पाडली.
ही शस्त्रक्रिया मुख्य शल्यचिकित्सक डॉ. मयुर दुधे, प्रथम सहाय्यक डॉ. कृणाल चेंदकापुरे, द्वितीय सहाय्यक सुमेध कांबळे, तृतीय सहाय्यक प्रियांका मडावी आणि भूलतज्ज्ञ डॉ. अंकिता भावते यांच्या पथकाने केली.
शस्त्रक्रियेनंतरच्या तपासणी अहवालात हा दुर्मिळ प्रकारचा कॅन्सर ‘मिक्स्ड जर्म सेल ट्युमर’ असल्याचे स्पष्ट झाले. यामध्ये ९० टक्के ‘योल्क सॅक ट्युमर’ आणि १० टक्के ‘एम्ब्रायोनल सेल कार्सिनोमा’चा समावेश होता. डॉक्टरांच्या तत्परतेमुळे कॅन्सरयुक्त गाठ वेळेत पूर्णपणे काढून टाकण्यात यश आले असून रुग्णाचे प्राण वाचले आहेत.
सर्वसामान्यांसाठी दिलासादायक सेवा:-
जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे कॅन्सरसारख्या गंभीर आजारांवरील शस्त्रक्रिया सुरू झाल्यामुळे गडचिरोली आणि परिसरातील गरीब व गरजू रुग्णांना मोठा आर्थिक दिलासा मिळत आहे. खासगी रुग्णालयांमध्ये लाखो रुपयांचा खर्च येणाऱ्या या शस्त्रक्रिया जिल्हा रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली मोफत आणि यशस्वीरीत्या पार पडत आहेत.
या दोन्ही यशस्वी शस्त्रक्रियांमुळे डॉ. वर्षा लहाडे यांच्यासह संपूर्ण डॉक्टर, नर्स आणि पॅरामेडिकल स्टाफच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे.
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन
Back to top button
Jaxx Wallet Download
Jaxx Liberty Wallet
Jaxx Wallet
gem visa login
gem visa login australia