ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
१४ आत्मसमर्पित माओवाद्यांची नसबंदी रिओपनिंग शस्त्रक्रिया
गडचिरोली पोलीस दलाचा 'प्रोजेक्ट संजीवनी'

गडचिरोली, प्रतिनिधी :-
माओवादी चळवळ सोडून मुख्य प्रवाहात सामील झालेल्या आत्मसमर्पित सदस्यांना आता सुखी कौटुंबिक आयुष्य जगता येणार आहे. गडचिरोली पोलीस दल आणि सर्च फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या ‘प्रोजेक्ट संजीवनी’ अंतर्गत, एकूण १४ आत्मसमर्पित माओवादी सदस्यांची नसबंदी रिओपनिंग शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे.
कौटुंबिक सुखासाठी ठरणार महत्त्वाचे पाऊल-
दलममध्ये कार्यरत असताना या सदस्यांना कौटुंबिक जीवन जगणे शक्य नव्हते. मात्र, आत्मसमर्पण केल्यानंतर त्यांना स्थिर आणि सुरक्षित आयुष्य मिळावे, या उद्देशाने २१ मार्च २०२६ रोजी सर्च फाउंडेशनच्या माँ दंतेश्वरी रुग्णालय, चातगाव येथे या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील १३ आणि गोंदिया जिल्ह्यातील ०१ सदस्याचा समावेश आहे. या सर्वांना २४ मार्च रोजी रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
आतापर्यंत ५० शस्त्रक्रिया पूर्ण –
गडचिरोली पोलीस दलाच्या पुढाकाराने आतापर्यंत एकूण ५० आत्मसमर्पित माओवाद्यांची नसबंदी रिओपनिंग शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, पूर्वी शस्त्रक्रिया झालेल्या ३६ सदस्यांपैकी १३ जणांना आतापर्यंत अपत्यप्राप्ती झाली असून त्यांचे संसार फुलले आहेत.
तज्ज्ञ डॉक्टरांचा सहभाग-
पद्मश्री डॉ. अभय बंग, पद्मश्री डॉ. राणी बंग आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली लीलावती रुग्णालय, मुंबई येथील डॉ. श्रीरंग पुरोहित, डॉ. सुशिल नेहेते, डॉ. लीना जैन, डॉ. वर्षा बारई आणि जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ. नागसेन साखरे यांनी या शस्त्रक्रिया पार पाडल्या.
पुनर्वसनासाठी विविध उपक्रम-
पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली आत्मसमर्पितांसाठी केवळ आरोग्यच नव्हे, तर रोजगार आणि प्रशिक्षणावरही भर दिला जात आहे:
रोजगार: ७२ आत्मसमर्पितांना लॉयड्स मेटल्समध्ये कौशल्य प्रशिक्षण व रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे.
गृहप्रकल्प: आत्मसमर्पितांसाठी स्वतंत्र रो-हाऊसचे बांधकाम प्रगतीपथावर असून प्रधानमंत्री व शबरी आवास योजनेअंतर्गत घरे मिळवून दिली जात आहेत.
इतर सोयी: आधारकार्ड, पॅनकार्ड मिळवून देणे, स्वयंरोजगारासाठी मोटार ड्रायव्हिंग, शिवणकाम आणि ब्युटीपार्लरचे प्रशिक्षणही दिले जात आहे.



