राज्यात 71 लाख मेट्रिक टन साखर उत्पादन; हंगाम फेब्रुवारीअखेर संपण्याची शक्यता
मुंबई,राज्यात सध्या साखर उत्पादनाचा हंगाम जोमात सुरू असून आतापर्यंत 777 लाख 41 हजार 466 मेट्रिक टन ऊस गाळप पूर्ण झाले आहे. 9.1 टक्के निव्वळ उताऱ्यानुसार सुमारे 71 लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन झाले असल्याची माहिती साखर आयुक्तालयाकडून देण्यात आली आहे.
राज्यातील 206 साखर कारखान्यांकडून प्रतिदिन 10 लाख 43 हजार 550 मेट्रिक टन ऊस गाळप सुरू आहे. मात्र ऊस उपलब्धता कमी होत चालल्याने पुढील आठवड्यानंतर कारखाने टप्प्याटप्प्याने बंद पडण्याची शक्यता साखर आयुक्तालयाने वर्तवली आहे.
मंत्री समितीच्या ऑक्टोबर 2025 मध्ये झालेल्या बैठकीत 2025-26 च्या गाळप हंगामासाठी ऊस उपलब्धता, साखर उत्पादन, उतारा आणि अन्य पूरक माहितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला होता. त्यानुसार यंदाच्या हंगामात किमान 1200 लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचा पूर्वअंदाज गृहीत धरण्यात आला होता.
मात्र सध्याच्या स्थितीचा विचार करता अद्याप सुमारे 400 लाख मेट्रिक टन ऊस गाळप बाकी असल्याचे चित्र आहे. हंगामअखेरीस राज्यात एकूण 105 लाख मेट्रिक टन साखर उत्पादनाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
सध्याची ऊस गाळप क्षमता लक्षात घेतल्यास शिल्लक ऊसाचे गाळप फेब्रुवारीअखेर किंवा 10 मार्चपर्यंत पूर्ण होऊन यंदाचा गाळप हंगाम संपुष्टात येईल, अशी माहिती साखर आयुक्तालयाचे सह संचालक महेश झेंडे यांनी दिली.



