आपला जिल्हाताज्या घडामोडी

लोकभाषा संवर्धन ही काळाची गरज : प्रा. विवेक जोशी

गोंडवाना विद्यापीठात गोंडी–माडिया बोलीभाषा अभ्यासक्रमाचे उद्घाटन

गडचिरोली, प्रतिनिधी :-

स्थानिक बोलीभाषा आणि संस्कृतीचे जतन करणे ही केवळ शैक्षणिक जबाबदारी नसून ती काळाची गरज आहे. बोलीभाषा आत्मसात केल्यास समाजाच्या मूळ प्रवाहाशी अधिक प्रभावीपणे जोडले जाता येते. भविष्यात विद्यार्थी प्रशासक म्हणून कार्य करतील, तेव्हा लोकांची बोलीभाषा अवगत असणे अत्यंत आवश्यक असून ती भाषा प्रशासक व समाज यांच्यातील महत्त्वाचा दुवा ठरेल, असे प्रतिपादन इंग्रजी विभागप्रमुख प्रा. विवेक जोशी यांनी केले.

गोंडवाना विद्यापीठाच्या आदिवासी अध्यासन केंद्र, इंग्रजी विभाग आणि इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन आठवड्यांच्या गोंडी–माडिया बोलीभाषा कौशल्य अभ्यासक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. हा कार्यक्रम विद्यापीठाच्या सभागृहात २ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडला.

प्रा. जोशी पुढे म्हणाले की, भारत हा विविध संस्कृतींनी नटलेला देश असून गोंडी–माडिया ही मध्य भारतातील एक प्राचीन व महत्त्वाची आदिवासी भाषा आहे. जागतिकीकरणाच्या ओघात या बोलीभाषांचे अस्तित्व टिकवून ठेवणे, स्वदेशी भाषिक वारसा जतन करणे आणि तो पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे अत्यंत आवश्यक आहे. हा अभ्यासक्रम बोलीभाषा संवर्धनासोबतच नवीन भाषिक जाणकार घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी आदिवासी अध्यासन केंद्राचे समन्वयक डॉ. वैभव मसराम यांनी प्रास्ताविकातून अभ्यासक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. गडचिरोलीसारख्या आदिवासी बहुल भागात प्रशासकीय, सामाजिक तसेच स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने स्थानिक भाषांचे ज्ञान अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. हा अभ्यासक्रम सर्व स्तरांतील शिकाऊ उमेदवारांसाठी परिचयात्मक भाषा प्रशिक्षण म्हणून राबविण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले.

इतिहास विभागप्रमुख डॉ. नंदकिशोर मने यांनी गोंडी–माडिया बोलीभाषेकडे ‘इतिहासाचा जिवंत दस्तऐवज’ म्हणून पाहण्याची गरज व्यक्त केली. या भाषा येथील संस्कृती, जल–जंगल–जमीन आणि इतिहासाशी घट्ट जोडलेल्या असल्याचे त्यांनी सांगितले. एकल ग्रामसभा सक्षमीकरण प्रकल्पातील अनुभव सांगताना, लोकांच्या मातृभाषेत प्रशासकीय व कायदेशीर बाबी समजावून सांगितल्यास लोकसहभाग अधिक प्रभावीपणे वाढतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाच्या विशेष सत्रात पदव्युत्तर विभागातील विद्यार्थी मारोती सिडाम, एकल ग्रामसभा प्रकल्पातील रविता नैताम, आदर्श पदवी महाविद्यालयातील विद्यार्थी आदित्य गेडाम, किरण विडपी व शामवेल पोंगाटी यांनी गोंडी–माडिया भाषेतील आपले दैनंदिन अनुभव मांडले.

२ ते १३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत चालणाऱ्या या अभ्यासक्रमात भाषेचा इतिहास, व्याकरण, संवाद कौशल्ये, शब्दसंग्रह व लोकसाहित्याचे भाषांतर यांचे प्रशिक्षण दिले जाणार असून विद्यार्थी व अभ्यासकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. वैभव मसराम यांनी केले. या कार्यक्रमास विद्यापीठातील प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी व प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker