आपला जिल्हाताज्या घडामोडी
पुरातून बाहेर काढले,नोकरी, परीक्षा आणि उपचारासाठी तातडीची मदत

गडचिरोली, प्रतिनिधी :-
अतिवृष्टीमुळे संपर्क तुटलेल्या गडचिरोली तालुक्यातील कुंभी गावातील तीन नागरिकांना जिल्हा प्रशासनाने तातडीने बचावकार्य राबवून सुरक्षितस्थळी हलविले. नोकरीसाठी रुजू होणे, स्पर्धा परीक्षेला उपस्थित राहणे आणि वैद्यकीय उपचारासाठी प्रवास करणे आवश्यक असल्याने प्रशासनाने त्वरित हालचाल करून आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या.
कुंभी येथील समीर विजय गेडाम (वय २५) यांची राजस्थान येथे बँक व्यवस्थापक म्हणून नियुक्ती झाली असून, त्यांना तातडीने रुजू होण्यासाठी गावाबाहेर पडणे आवश्यक होते. तसेच कु. तुलसी नवबोध गेडाम (वय २१) यांची नागपूर येथे परीक्षा असल्याने त्यांनाही सुरक्षित बाहेर काढण्यात आले. दिलीप पितांबर गेडाम (वय ५०) यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुढील उपचारासाठी बाहेर हलविण्यात आले.
या परिस्थितीची माहिती गडचिरोलीचे पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाला दिल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तात्काळ एसडीआरएफ आणि जिल्हा पोलिसांच्या बचाव पथकाला बोटीसह आवश्यक साहित्यांसह घटनास्थळी रवाना केले.



