गडचिरोलीत ओवरलोड रेती–गिट्टी टिपरांचा उच्छाद; प्रशासन निष्क्रिय, नागरिकांच्या जीविताशी थेट खेळ

गडचिरोली, प्रतिनिधी :-
शहरातील अरुंद वस्ती मार्गांवर ओवरलोड रेती व गिट्टी वाहून नेणाऱ्या टिपर वाहनांचा सुळसुळाट वाढत असून, विद्यार्थ्यांसह सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. नियमांना केराची टोपली दाखवत भरधाव वेगाने धावणारी ही अवजड वाहने म्हणजे जणू वस्ती भागात फिरणारा मृत्यूचा सापळाच ठरत आहेत. मात्र, या गंभीर प्रकाराकडे प्रशासन डोळेझाक करत असल्याचा आरोप संतप्त नागरिकांकडून होत आहे.
साईनगर वॉर्ड परिसरात रेती–गिट्टी वाहतूक करणारी ओवरलोड टिपर वाहने दिवसेंदिवस मोकाट होत असून, आज सायंकाळी सुमारे ४ ते ४.१५ वाजताच्या सुमारास कारमेल शाळेच्या मागील अरुंद मार्गावरून अत्यंत वेगात टिपर धावत असल्याचे दृश्य नागरिकांनी पाहिले. विशेष म्हणजे हा रस्ता सिंगल असून दाट वस्तीमधून जातो. याच मार्गाचा वापर शाळकरी विद्यार्थी, लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक व पादचारी मोठ्या प्रमाणावर करतात. अशा ठिकाणी अवजड वाहनांची बेदरकार वाहतूक म्हणजे अपघाताला उघड आमंत्रण असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, रेती व गिट्टीची वाहतूक करताना मंजूर रॉयल्टीपेक्षा कितीतरी पटीने अधिक साठा वाहून नेला जात आहे. वाहतुकीदरम्यान रेती व गिट्टी रस्त्यावर सांडल्याने रस्ते घसरडे होत असून, दुचाकी व चारचाकी वाहनचालकांसाठी ते जीवघेणे ठरत आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे.
“उद्या साईनगर वॉर्डात एखादी मोठी दुर्घटना घडली, तर त्याची जबाबदारी कोण घेणार?” असा थेट सवाल उपस्थित करत नागरिकांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. ओवरलोड टिपर वाहतुकीकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
साईनगर वॉर्डातील नागरिकांनी ओवरलोड टिपर वाहनांवर तातडीने कडक कारवाई, वेगमर्यादेची काटेकोर अंमलबजावणी, रॉयल्टी तपासणी आणि वस्ती भागातून अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्याची ठाम मागणी केली आहे. अन्यथा, प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.



