आपला जिल्हा
गडचिरोली वनविभागात कोट्यवधींचा भ्रष्टाचार

गडचिरोली,प्रतिनिधी :-
आलापल्ली वनविभागातील आलापल्ली व पेरमिली वनपरिक्षेत्रांमध्ये बोगस मजुरांच्या नावावरून व खोट्या स्वाक्षऱ्यांद्वारे कोट्यवधी रुपयांची अफरातफर झाल्याचा आरोप राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा भाजप जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे यांनी केला आहे. या प्रकरणी संबंधित वनअधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.
मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. खुणे म्हणाले की, “वनपरिक्षेत्र अधिकारी, क्षेत्र सहाय्यक व काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संगनमताने शासन निधीचा अपहार करण्यात आला आहे. चौकशी अधिकार्यांनीही बोगस चौकशी करून संबंधितांना पाठीशी घातली,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.
या प्रकरणाची उच्चस्तरीय समिती गठित करून फौजदारी गुन्हा नोंदवावा, तसेच भ्रष्ट अधिकाऱ्यांकडून कोट्यवधी रुपयांची वसुली करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
सन २०२३-२४ व २०२४-२५ या कालावधीतील जिल्हा वार्षिक योजना, सर्वसाधारण आदिवासी उपयोजना, राज्य योजना, कॅम्पा योजना व संयुक्त वनव्यवस्थापन समिती अंतर्गत करण्यात आलेल्या कामांमध्येही भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला.
या सर्व कामांची स्वतंत्र व व्हिडीओ चित्रीकरणासह प्रत्यक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी डॉ. खुणे यांनी यावेळी केली.



