आपला जिल्हाताज्या घडामोडी

ग्रामसभांना बांबू तोडणी परवानगीबाबत शुक्रवारी निर्णयाची शक्यता

जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत सीसीएफचे आश्वासन

गडचिरोली, प्रतिनिधी :-

कुरखेडा व मालेवाडा परिसरातील ग्रामसभांना बांबू तोडणीची परवानगी देण्याबाबत वन विभागाकडून शुक्रवारपर्यंत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्य वनसंरक्षक (सीसीएफ), गडचिरोली यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत दिले.

ग्रामसभांनी बांबू कटाईसंदर्भात आवश्यक सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून प्रस्ताव उपवनसंरक्षक (डीएफओ) वडसा यांच्याकडे सादर केला होता. मात्र संबंधित गावे ‘रिझर्व फॉरेस्ट’मध्ये येत असल्याची नवीन अट घालून डीएफओ वडसा यांनी प्रस्ताव परत केल्याने ग्रामसभांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. दरम्यान, बांबू तोडणीचा हंगाम मार्चपर्यंत मर्यादित असल्याने त्यानंतर मजूर उपलब्ध होत नसल्यामुळे ग्रामसभांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.

या पार्श्वभूमीवर आमदार रामदास मसराम, भाजपा जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम तसेच ग्रामसभांच्या अध्यक्षांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन सर्व पात्र ग्रामसभांना बांबू कटाईची मंजुरी देण्याची मागणी केली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात ग्रामसभा प्रतिनिधी व वन विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली.

बैठकीत सीसीएफ गडचिरोली यांनी संबंधित प्रकरणाचा आढावा घेऊन शुक्रवारपर्यंत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. तसेच जिल्हाधिकारी यांनीही वन विभागाला या विषयावर तातडीने निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या.

गेल्या अनेक महिन्यांपासून कुरखेडा व मालेवाडा क्षेत्रातील ग्रामसभांनी बांबू कटाईसाठी जाहिरात प्रक्रिया व इतर प्रशासकीय कार्यवाही पूर्ण केली होती. मात्र ऐनवेळी प्रस्ताव नाकारण्यात आल्याने ग्रामसभांनी आमदार डॉ. मिलिंद नरोटे, आमदार रामदास मसराम व भाजपा पदाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही निवेदन सादर करण्यात आल्याची माहिती शिष्टमंडळाने दिली.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker