आपला जिल्हाताज्या घडामोडी

११ फेब्रुवारीपासून गडचिरोली पोलीस भरतीची मैदानी चाचणी सुरू

७४४ पदांसाठी तब्बल २७ हजारांहून अधिक उमेदवारांचे अर्ज

गडचिरोली, प्रतिनिधी :-
गडचिरोली जिल्हा पोलीस दलामार्फत पोलीस भरती २०२४-२०२५ (प्रत्यक्ष भरती प्रक्रिया २०२६) अंतर्गत चालक पोलीस शिपाई व पोलीस शिपाई पदांसाठी मैदानी (शारीरिक) चाचणीला ११ फेब्रुवारी २०२६ पासून प्रारंभ होत आहे. ही चाचणी ८ मार्च २०२६ पर्यंत गडचिरोली पोलीस मुख्यालयाच्या पटांगणावर पार पडणार आहे.

पोलीस विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार चालक पोलीस शिपाईच्या २७ जागांसाठी ३२९६ उमेदवारांनी अर्ज केले असून त्यामध्ये २७९७ पुरुष व ४९९ महिला उमेदवारांचा समावेश आहे. तर पोलीस शिपाईच्या ७१७ पदांसाठी तब्बल २३ हजार ७९१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून त्यात १६ हजार ३१० पुरुष व ७ हजार ४८१ महिला उमेदवारांचा समावेश आहे. अशा प्रकारे एकूण ७४४ पदांसाठी २७ हजार ८७ उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने भरती प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

चालक पोलीस शिपाई पदांची भरती ११ ते १३ फेब्रुवारी दरम्यान पार पडणार असून पोलीस शिपाई पदभरती १४ फेब्रुवारी ते ७ मार्च या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. भरती प्रक्रियेदरम्यान पहिल्या दिवशी सुमारे १३०० उमेदवारांची तर त्यानंतर दररोज सरासरी १५०० उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे.

भरती प्रक्रियेसाठी प्रत्येक उमेदवाराकडे गडचिरोली जिल्ह्याचे वैध रहिवासी प्रमाणपत्र असणे अनिवार्य करण्यात आले असून सर्व कागदपत्रे ७ डिसेंबर २०२५ पूर्वीची असणे बंधनकारक असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. उमेदवारांना प्रवेशपत्र महाआयटी विभागामार्फत ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आले असून https://policerecruitment2024.mahait.org� या संकेतस्थळावरून प्रवेशपत्र डाउनलोड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ही भरती प्रक्रिया अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येणार आहे. उमेदवारांची उंची व छाती मोजण्यासाठी पीएसटी डिजिटल प्रणालीचा वापर केला जाणार असून धावण्याच्या चाचणीसाठी आरएफआयडी आधारित तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. तसेच गोळाफेक चाचणीसाठी प्रिझम तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. मैदानी चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांची बायोमेट्रिक पडताळणी करून पुढील लेखी परीक्षेसाठी पात्रता निश्चित करण्यात येणार आहे.

भरती प्रक्रियेदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ६९ अधिकारी व ४८२ पोलीस अंमलदार असे एकूण ५५१ मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे. तसेच उमेदवारांनी कोणत्याही प्रकारच्या आमिष किंवा गैरप्रकारांना बळी पडू नये, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. कोणीही प्रलोभन देत असल्यास पोलीस अधीक्षक कार्यालयातील समाधान कक्ष (दूरध्वनी क्रमांक ८८०६३१२१००) येथे माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker