आपला जिल्हाताज्या घडामोडी

कारागिरांना नवी ओळख; गोंडवाना विद्यापीठाच्या चौपाल उपक्रमातून 130 हून अधिक नोंदणी

गडचिरोली,प्रतिनिधी :-
ग्रामीण व आदिवासी कारागिरांना शासकीय योजनांशी जोडून त्यांना अधिकृत ओळख मिळवून देण्यासाठी गोंडवाना विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्राने (STRC) राबविलेल्या ‘चौपाल’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमाअंतर्गत 130 हून अधिक कारागिरांची ‘आर्टिजन पहचान कार्ड’साठी नोंदणी करण्यात आली.

केंद्र शासनाच्या हस्तकला प्रोत्साहन योजनेअंतर्गत राबविण्यात आलेल्या या कार्यक्रमामुळे स्थानिक कारागिरांना राष्ट्रीय स्तरावर ओळख, शासकीय योजना, कौशल्यविकास प्रशिक्षण तसेच विपणनाच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले.

गोंडवाना विद्यापीठाच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे होते. कार्यक्रमाला उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, अतिरिक्त संचालक (हस्तकला) अवधेश ठाकूर तसेच ट्रायसेफचे संचालक डॉ. मनीष उत्तरवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

अध्यक्षीय भाषणात डॉ. कावळे यांनी गडचिरोली जिल्ह्यातील पारंपरिक कला व हस्तकौशल्याला बाजारपेठेची जोड मिळणे आवश्यक असल्याचे सांगितले. उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे यांनी चौपाल उपक्रम पुढील काळात तालुका स्तरावरही राबविण्याचे संकेत दिले.

कार्यक्रमादरम्यान कारागिरांना नोंदणी प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे तसेच विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. अतिरिक्त संचालक अवधेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक सत्र आयोजित करण्यात आले. यावेळी कारागिरांचे अर्ज भरून घेऊन कागदपत्रांची पडताळणीही करण्यात आली.

विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्राच्या चमूने विशेष परिश्रम घेऊन हा उपक्रम यशस्वी केला. मुख्य कार्यक्रम अधिकारी स्वप्निल गिराडे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण नियोजन व समन्वय साधण्यात आला.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker